Tuesday, 1 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –01 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१  ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज आपली एकशे पंचवीस उमेदवा्‍रांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण मध्य मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं पक्षाचे सरचिटणीस अरूण सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं. पक्षानं विद्यमान बारा  आमदारांना उमेदवारी दिली नसल्याचंही ते म्हणाले.
मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं गोंदीया जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदार संघांत विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यात तिरोडा विधानसभेसाठी विजय रहानगडाले, देवरी विधानसभेसाठी संजय पुराम आणि अर्जुनी मोरगाव इथून राजकुमार बडोले या आमदारांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची नावं मात्र पहिल्या यादीत नाही. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटल्यामुळं भाजपच्या इच्छूक उमेदवारांनी टाळ मृदुंग वाजवून आत्मक्लेष आंदोलन केलं.
****
दरम्यान, सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांनी तर सातारा विधानसभा निवङणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथून बबनराव पाचपुते यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदात संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आज सत्तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघासाठी रमेश बोरनवे, परभणी - डॉ.राहूल पाटील, गंगाखेड - विशाल कदम, बीड - जयदत्त क्षीरसागर, नांदेड दक्षिण - राजश्री पाटील, मुरूड - महेंद्र दळवी, हदगाव - नागेश अष्टीकर, देगलूर - सुभाष साबणे, उमरगा - लोहरा - मतदारसंघासाठी ग्यानराज चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पक्षानं औरंगाबाद मध्यसाठी एबी फॉर्म दिल्याचं कळवलं आहे.
****
सभाजी ब्रिगेडनं विधानसभा मतदारसंघासाठी पंधरा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये नांदेडच्या किनवट-माहूर मतदारसंघासाठी विशाल शिंदे, बीड मतदारसंघासाठी राहुल वायकर तर जालना जिल्ह्यातल्या मंठा परतूर मतदारसंघासाठी राजीव मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजिनामा द्यावा आणि राजकारण सोडून द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं केली आहे. मुख्यमंत्र्यांनी  गेल्या निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्यासंदर्भात सुरू असलेली सुनावणी सत्र न्यायालयात सुरू ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत ही मागणी केली.
****
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातल्या तरतुदी शिथील करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निर्णय न्यायालयानं आज रद्दबातल ठरवला. मार्च 2018 मधे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठानं या कायद्यातल्या तरतुदी शिथील केल्या होत्या. त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्रसरकारनं तसंच इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं आज हा आदेश दिला.
****
पीएमसी, अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी या बँकेचं आधीचं व्यवस्थापक मंडळ आणि एचडीआयएल, अर्थात हाऊसिंग लिमिटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या प्रशासकाच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं या अधिका-यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्ह्याच्या कटाचा, तसंच बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
***
सिंचनासाठी मराठवाड्यातल्या धरणांची कार्यक्षमता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पध्दतीत बदल करण्याचं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विजय दिवाण यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं गांधीजींच्या शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘मराठवाड्याचा पाणी प्रश्न’ या विषयावर बोलत होते. उपलब्ध पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी हे उसासाठी वापरलं जातं, त्यामुळे कमी पाण्यावर येणारी ज्वारी, मका सारखी पिकं घेणं गरजेचं असल्याचं प्रा. दिवाण यांनी यावेळी सांगितलं. जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मराठवाड्यातल्या एक लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र सिंचन व्यवस्थेअभावी पाच जिल्ह्यातल्या अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रालाच याचा लाभ होत असल्याची खंत विजय दिवाण यांनी यावेळी व्यक्त केली.
****


No comments:

Post a Comment