▼

Wednesday, 2 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –02 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२  ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त तसंच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं त्यांना अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा. हचिन्सन हे शिष्टमंडळासह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी पुष्पांजली अर्पण केली. परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीमध्ये धर्मापुरी ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान करण्यात आलं. हिंगोली इथं शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. एकदाच वापरल्या जाणा-या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळावा, असं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केलं.  दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड स्थानकामध्ये आज विशेष स्वच्छता कार्यक्रमाच आयोजन केलं होत. रेल्वे विभागानं अनेक रेल्वे गाड्यांच्या इंजिनवर गांधीजींचे तैलचित्र रंगवून गांधाजींना अभिवादन केलं .
औरंगाबाद जिल्हापरिषदेच्या वतीनं वेरूळ लेणी परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी एकदा वापरायच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याचं आवाहन केलं. गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जयंती आणि `बंदी दिना` निमित्त औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात प्रसिध्द सरोद वादक पंडीत विवेक जोशी यांच्या सरोद वादनाचा कार्यक्रम तसंच कैद्यांच्या विविध स्पर्धा झाल्या.
****
विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षानं आज सातवी यादी प्रसिध्द केली. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर - उदगीर  मतदारसंघासाठी सय्यद ताहेर हुसैन मोईनुद्दीन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पुण्यातल्या हडपसरसाठी जाहीद ईब्राहिम शेख, सांगली जिल्ह्यातल्या मिरज सांगली या अनुसूचीत जाती प्रवर्गाच्या राखीव मतदारसंघासाठी आयेशा मोहम्मद काझी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी कळवलं आहे.
दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील हे आज संध्याकाळी सात वाजता औरंगाबादमध्ये आमखास मैदानावर प्रचार सभा घेणार आहेत.
****
नितेश राणे हे विधानसभा निवडणुकीत भाजपचे कणकवलीचे उमेदवार असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. त्याचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत असेल, असंही त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत नमुद केलं आहे. नितेश राणे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली इथून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या आठडाभरात भाजपमध्ये विलीन होईल, असंही राणे यांनी यावेळी नमुद केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील युती आणि आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. मात्र, या उमेदवारांच्या नावांच्या घोषणांच्या पार्श्र्वभूमीवर मित्र पक्षांतील अनेक इच्छुकांमध्ये असंतोष आहे. हिंगोली जिल्ह्यात असंतुष्ट बंडखोरीचं निशाण फडकवणार की नेते त्यांचं मन वळवणार याकडे जिल्हावासियाचं लक्ष लागलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हिलाल माळी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माळी यांचं उमेदवारी मिळाल्यानंतर आज धुळ्यात आगमन प्रसंगी कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं.
****
लातुर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिव्यांग विद्यार्थ्यांच्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीत सर्व दिव्यांग मतदारांनी आपलं अमूल्य मत नोंदवून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी केलं.
****
किसानसभा आणि शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी प्रश्र्न निवडणुकीतील मुख्य मुद्दे व्हावे यासाठी `मी शेतकरी` अभियानाला आजपासून राज्यभरात प्रारंभ झाला. परभणी जिल्ह्यात पारावर ठिय्या मांडून अभियानाला प्रारंभ झाला. 
****
रोहित शर्माच्या नाबाद एकशे पंधरा धावांमुळे भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी बिनबाद दोनशे दोन धावा केल्या.
****

No comments:

Post a Comment