आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
दिनांक – २६ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत आपल्या निवासस्थानी
पक्षाच्या निवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना आणि भाजपनं विधानसभेच्या
निवडणुकीत २८८ पैकी एकशे एकसष्ट जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना प्रमुख
उद्धव ठाकरे दिवाळीनंतर सरकारस्थापन करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे.
***
राज्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी
रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळी रिमझिम पाऊस झाला. जायकवाडी धरणातून कालपासून पाणी
सोडण्यात आल्यामुळे नांदेड शहरात गोदावरी नदीला पुर आला आहे. परभणी आणि जालना इथंही
पाऊस पडत असल्यानं नांदेडच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी पूर स्थितीची पाहणी केली असून नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात
आला आहे. नांदेड शहरात २००५ नंतर यंदा प्रथमच
पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परतीच्या पावसामुळे
लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, धर्माबाद, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यांत पिकांचं मोठं
नुकसान झालं आहे. सरकारनं पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.
***
राज्यात मुंबई आणि कोकण विभागात येत्या ४८ तासात मेघगर्जनेसह पाऊस
पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या
`कयार` वादळाचा फटका सिंधुदुर्ग किनारपट्टीला बसला आहे. मालवण, देवबाग, आचरा तसंच अन्य
समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं आहे. मोठ्या लाटांसह वारा
आणि पावसाचा जोरही वाढला आहे. देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घेतला असून ग्रामस्थ
भीतीच्या छायेत आहेत. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात पडझडीच्या अनेक
घटना घडल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य
रेल्वेच्या वतीनं नांदेड-पुणे-नांदेड दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येत
आहेत. येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत या विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती दक्षिण
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.
//*************//
No comments:
Post a Comment