Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –28 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना
प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात बुधवारी होणार असलेल्या बैठकीनंतरच
राज्यातील सत्तास्थापने संदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनामध्ये भेट
घेतली. भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये राज्यात सत्तास्थापनेतील भागीदारीसंदर्भात सुरू
ताण- तणावाच्या पार्श्र्वभूमीवर ही भेट झाली. ही सदिच्छा भेट होती, असं राजभवनातील
अधिकाऱ्यांनी या संदर्भात म्हटलं आहे. शिवसेनेचे
नेते दिवाकर रावते यांनीही आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी
आपण राज्यपालांना भेटलो, असं रावते यांनी नमुद केलं आहे.
****
अमरावती
जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांच्यासह
भाजप बंडखोर मीरा भाईंदर मधून निवडून आलेल्या
गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या दोन अपक्ष आमदारांनी भाजपला
पाठिंबा दिला आहे. रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं
पात्र पाठवलं तर गीता जैन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. जैन
यांनी भाजपतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत
त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून
आले आहेत.
****
सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी काँग्रेस आघाडीला केली
असून भाजपच्या पराभवाला तेच जबाबदार असल्याचा आरोप जत येथील भाजपचे माजी आमदार विलासराव
जगताप यांनी केला आहे. पक्षानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी
जत इथं पत्रकारांशी बोलताना केली आहे.
****
अरबी समुद्रात
निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे. यामुळे येत्या
चोवीस तासात अरबी समुद्र क्षेत्रात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर
हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधल्या
किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कयार चक्रीवादळ सध्या मुंबईपासून
सुमारे ५४० किलोमीटर दूर आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दररोज होत असलेल्या पावसामुळे लाखो एकर शेतीवरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे.
जिल्ह्यात कापणी केलेलं सोयाबीन पाण्यावर तरंगून
कुजत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सरकारनं याची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
****
अमरावती जिल्ह्यातही सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसानं सोयाबीनच्या
शेंगांना कोंब येत असून शेतातील तुरीच्या पिकाचंही मोठं नुकसान होत आहे. जिल्ह्यात
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचे बोंडही आळी सोडत आहे.
या पावसाचा संत्री बागांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानं अमरावती जिल्ह्यातील
शेतकरी चिंतातूर असून नुकसानभरपाईची मागणी करत आहे.
****
अमरावती जिल्ह्यात भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली साडे चारशे किलोची
बर्फी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल रात्री नांदगाव पेठ परिसरातून जप्त केली आहे.
या कारवाईमुळे अमरावतीमध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
अलिबाग -मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात
दोन जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला खंडाळा
घाटातील खोपोलीजवळ ट्रेलर आणि टेम्पोची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. जखमी व्यक्तीवर
खोपोलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे या भागातील वाहतूक काही
काळ विस्कळीत झाली होती.
****
हंगेरीतल्या बुडापेस्ट इथं आजपासून तेवीस
वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होत आहे. या
स्पर्धेत भारताचा तीस जणांचा संघ सहभागी झाला आहे. या स्पर्धेत जगभरातल्या साठ संघांचे सहाशे मुष्टीयोद्धे
सहभागी होत आहेत. या स्पर्धेत आशियायी युवा सुवर्णपदक विजेता
शरवणकडून भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत.
****
No comments:
Post a Comment