▼

Friday, 15 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं राज्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अहवाल तयार करून आवश्यक मदत करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दोन दिवस पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं नुकसानीची सरसकट पहाणी करावी आणि त्यानुसार तातडीनं मदत द्यावी, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. आता होत असलेल्या केवळ तेहतीस टक्क्यांवरील नुकसान असा नियम लावून पंचनामे आणि मदत होऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. येत्या सोमवारी संसदेचं सत्र सुरू होत आहे, त्यावेळी कृषी आणि अर्थमंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.
****
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांत चर्चा सुरू आहे. आज न उद्या त्यावर मार्ग निघेल, असं पवार यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसून हे सरकार बनेल, पाच वर्षे चालेल, यावर या पक्षांच्या नेत्यांचं लक्ष असेल, असंही त्यांनी नमुद केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षतेवर काम करतात, तसंच पुढंही काम करू असं त्यांनी यावेळी एका प्रश्र्नाच्या उत्तरात नमुद केलं. काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली असून आणखी काही मुद्दांवर चर्चा करायची असल्यानं दोन - तीन दिवसांत दिल्लीत पुन्हा बैठक घेण्यासंदर्भात आपण सुचवलं असल्याचं त्यांनी या संदर्भात नमुद केलं. राज्यात स्थीर सरकार असावं, विकास व्हावा, राज्या समोरचे यक्ष प्रश्र्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी या सर्व पक्षांची इच्छा असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.
****
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचं वगनाट्य रोज सकाळी आपण अऩुभवत आहोत, असं नमुद करत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. तीन पक्षांचं नाट्य राज्य पहात आहे आणि ते राज्याला मान्य नाही, असंही त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यानं सरकार बनवण्यासाठी सुरू शिवसेनेच्या प्रयत्नांसंदर्भात म्हटलं आहे. 
पुर्वी सर्व राजकीय नेते शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत आता सत्ता लालसेपोटी मातोश्रीहून निघून नेते पंचतारांकित हॉटेलच्या फेऱ्या करत आहेत, असं नमुद करत शेलार यांनी उद्धव ठाकरे विविध पक्षांशी करत असलेल्या चर्चेवरही यावेळी टीका केली.
****
राज्यातील आगामी सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली होईल आणि त्या करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्याच्या हिताचा समान किमान कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना आगामी पाच नव्हे तर पंचवीस वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवेल, असं राऊत यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सह मुख्यमंत्रीपद विभागून घेणार काय, या प्रश्र्नाच्या उत्तरात म्हटलं. 
****
निवृत्तीवेतनधारकांचं मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खातं उघडण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत मासिक निवृत्तीवेतनाची रक्कम प्रदान करण्यात येते. निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्ती वेतन धारकाला स्वतंत्र निवृत्तीवेतन खातं उघडावे लागत असे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशानं आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली  आहे. आता  निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नवीन  बँक खाते उघडण्याची गरज नाही. त्यांना आवश्यक त्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून योग्य त्या कार्यवाहीनंतर त्यांच्या पूर्वीच्या संयुक्त खात्याद्वारेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येणार आहे. 
****
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीनं रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्युंमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करण्याबाबत निर्देश दिले आहेत. राज्यातल्या रस्त्‍ो अपघातांचा आढावा घेतला असता, सुमारे तीस टक्के अपघात हे वाहनचालकांनी भरधाव वेगानं वाहन चालविल्यानं होतात, असं निदर्शासनास आलं आहे. ज्या वळण रस्त्याची त्रिज्या पन्नास मीटरपेक्षा कमी आहे अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी तीस किलो मीटर  तर सर्व रस्त्यांवरील बोगद्यामध्ये वेग मर्यादा ताशी ऐंशी किलो मीटर निश्चित करण्यात आली असल्याचं या समितीनं म्हटलं आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं एकोणसाठावी राज्य नाट्य  स्पर्धेची प्राथमिक फेरीची स्पर्धा  आजपासून औरंगाबाद इथं सुरू होणार आहे. शहरातल्या तापडिया नाट्यगृहात ३० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. दरम्यान आज सायंकाळी सात वाजता येस आय ॲम गिल्टी या सत्यजित खारकर लिखित नाटकाचा प्रयोग होणार आहे.
****
मयांक अग्रवालच्या सुरेख शतकामुळे भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी तीन बाद दोनशे बारा धावा करून बासष्ट धावांची आघाडी मिळवली आहे.
****


No comments:

Post a Comment