▼

Saturday, 16 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत १५ दिवसीय राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवात आदिवासी संस्कृती, आदिवासी हस्तकौशल्य, खाद्यपदार्थ आणि आदिवासी उद्योग यांचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या आदिवासींचे उत्कृष्ट हस्तकौशल्य आणि कापड निर्मिती हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. याबरोबरच तामिळनाडू, गुजरात, नागालँड आणि सिक्कीममधल्या आदिवासींचे हस्तकौशल्यही लक्षवेधी ठरणार आहे.
****

 शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून भारतीय जनता पक्षाच्या सरकार स्थापन्याच्या दाव्यावर जोरदार टिका केली आहे. भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यास माघार घेऊनही, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांचा सरकार स्थापन्याचा दावा म्हणजे ते घोडेबाजार करणार असल्याचं दर्शवत असं शिवसेनेनं म्हटलं आहे. भाजपाच्या पारदर्शी कारभाराचा खोटा चेहरा यातून दिसून येत असल्याचंही यात म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी भारतीय जनता पक्षात गेलेले नेते परत पक्षांतर करु नयेत, यासाठी भाजपाचे नेते आम्हीच सरकार स्थापन करू असं विधान करत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी आघाडी सरकार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही नवाब मलिक यांनी समाचार घेतला. 
****

 राफेल खरेदी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी देशाला चुकीची माहिती देत देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत राहूल यांनी या प्रकरणी माफी मागावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज देशव्यापी अंदोलन केले जाणार आहेत. राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालायच्या निकालानं काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघडा पडला असल्याचं भाजपाचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगीतलं.

 सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमध्ये काल तीन जणांना अटक करण्यात आली. पोलिसात या प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीनुसार सादिक मलीक याने समाज माध्यमावर या निकालाविरोधात पोस्ट टाकली आणि त्यास दोन जणांनी ’लाईक’ केल्यामुळं या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आयोध्येतील विवादित जागा राम मंदिराच्या बांधणीसाठी तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय दिला होता.
****

 शबरीमलातील अय्यप्पा मंदीर आज संध्याकाळी दोन महिने चालणाऱ्या यात्रेसाठी अत्यंत बदोबस्तात उघडण्यात येणार आहे. या यात्रेनिमित्त कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्य सरकारनं पूर्णपणे तयारी केली आहे. कंडारारू महेश मोहनरारू हे मंदिराचा गाभारा उघडून पूजा करणार आहे. पदी पूजा केल्यानंतर यात्रेकरूंना पवित्र अठरा पायऱ्या चढू देण्यात येणार असून दर्शनही घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातीला महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकांवरील सुनावणी स्थगित ठेवली आहे. सदर प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आलं असून त्यामध्ये मशीदमधील तसंच पारशी धर्मातील अग्यारीमधील महिलांच्या प्रवेशाचाही विचार करण्यात येणार आहे.
****

        अमरावती विभागात १७  ते २८ ऑक्टोंबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने वीस लाख शेतकऱ्यांच्या सुमारे २२ लाख ४४ हजार हेक्टर मधल्या शेती आणि फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठवला आहे. राष्ट्रीय अपत्ती प्रतिसाद दल  एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे १५४३ कोटी ६७ लाखांच्या नपेक्षित निधीची मागणी केली आहे. आवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिले होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक सांस्कृतिक, क्रीडा कला नगरी म्हणून ओळखला जातो. या नगरीचं वैशिष्ट आणि महत्त्व नव्या पिढीला समजावं, यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यामध्ये १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड हेरिटेज सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या हेरीटेज आणि सांस्कृतिक वास्तूंचे महत्व जनतेसमोर यावं यासाठी हेरिटेज वॉक आणि हेरिटेज हंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. सोबतच जिल्ह्यातल्या ऐतिहासिक वास्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शनही शाहू स्मारक इथं भरवण्यात येणार आहे.
*****
***

No comments:

Post a Comment