Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी
भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यांनी
आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं
मोठं नुकसान झालं असल्यानं त्यांना त्वरित मदत निधी वितरित करुन दिलासा द्यावा, अशी
मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. त्यावर लगेच कार्यवाही करू, अशी ग्वाही राज्यपालांनी
दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गरीब रुग्णांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधीचं
संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं आणि एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित
राहणार नाही, याची काळजी घ्यावी, या आपण केलेल्या विनंतीवरही तात्काळ कार्यवाहीचं आश्वासन
राज्यपालांनी दिलं असल्याचं फडणवीस म्हणाले.
****
दरम्यान,
शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या
नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज वेळ मागितली होती. राज्यपालांनी त्यांना
उद्या दुपारी तीन वाजता या भेटीसाठी वेळ दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे
मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली.
****
राज्यात
लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी
व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
पदाबाबत दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर निर्णय होतील, अशी माहितीही त्यांनी
यावेळी दिली. अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र
फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घ्यायला उशीर केला, अशी टीका त्यांनी केली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी
कॉंग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली होती, तसंच सध्या दोन्ही पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी
शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. कॉंग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत `तीन अंकी नाटक` असा खिल्लीवजा
उल्लेख भाजप करत असलं तरी त्यांना नाटकाचा शेवट माहीत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी
या संदर्भात म्हटलं.
****
शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि नेवरी इथल्या नुकसानग्रस्त
पिकांची पाहणी केली. अवकाळी पावसानं द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, ज्वारी आणि खरीप हंगामातील
पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संकट मोठं आहे. त्यावर खचून जाऊ नका, काळजी
करू नका, असा दिलासा ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांशी बोलताना दिला. सरकारकडून यासाठी
मदत मिळावी या करता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवसेना
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बँक, विमा आणि सरकारी संस्थांसंबंधित प्रश्र्न सोडवण्यात
सहकार्यासाठी बासष्ट मदत केंद्र सुरू करणार आहे. शासकीय संस्था आणि शेतकरी यांच्यातील
दुवा म्हणून ही केंद्रं काम करतील, अशी माहिती पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली
आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात सहभागी होण्यासाठी सरकारी
संस्थाकडून परवानग्या घ्यायला आपण कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचंही दानवे यांनी
यासंदर्भात म्हटलं आहे.
****
औरंगाबादमधील
एक फौजदार तसंच जमादाराला भंगार विक्रेत्याकडून ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना अटक
करण्यात आली आहे. फौजदार राहुल रोढे आणि जमादार शेख अन्वर या दोघांना ते कार्यऱत असलेल्या
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या परिसरात काल रात्री लाच स्वीकारताना अटक करण्यात आलं.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या माहितीनुसार या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका
भंगार विक्रेत्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवू नये या करता दोन लाख रुपयांची लाच मागितली
होती.
****
औरंगाबाद-सोलापूर
महामार्गावर अंबड तालुक्यातल्या दोदडगाव पाटीजवळ आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारं वाहन
उलटून झालेल्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला तर चोवीस जण जखमी झाले आहेत. हे सर्व
मजूर मध्यप्रदेशातील असून गेवराईच्या सूतगिरणीवर कामासाठी जात होते. जखमींतील तिघांची
प्रकृती चिंताजनक आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात कृषी विभागानं शेतकऱ्यांना अनुदानावर मुबलक प्रमाणात हरभरा बियाणं वाटप करावं,
अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे. त्यांनी
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन ही मागणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या
काळात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणं नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करून देणार असल्याचं
म्हटलं आहे.
****
नांदेडच्या
नानक साई फाऊंडेशनच्या `संत नामदेव घुमान` यात्रेला हरियाणाचा `पानिपत शौर्य तीर्थ
पुरस्कार` नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पानिपतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर
संघातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment