Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
दिल्लीतल्या निर्भया
सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च
न्यायालयानं कायम ठेवली आहे. या प्रकरणी २०१७ मध्ये दिल्या गेलेल्या निकालावर पुनर्विचार
करण्याची, या प्रकरणातला एक दोषी अक्षय कुमार सिंह याची याचिका, न्यायमूर्ती आर भानुमती
यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज फेटाळून लावली. यानंतर दोषीच्या वकिलांनी, राष्ट्रपतींकडे
दयेचा अर्ज करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. यावर, ही याचिका दाखल करण्यासाठी
कायद्यानुसार फक्त एक आठवड्याचा वेळ असतो, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या
निदर्शनाला आणून दिलं.
सोळा डिसेंबर २०१२ च्या
रात्री घडलेल्या या प्रकरणातल्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग, न्यायालयाच्या आजच्या
निर्णयानं मोकळा झाला आहे.
****
महिलांवरचे अत्याचार
रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर
‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती गृहमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. सदस्य डॉ.मनीषा कांयदे यांनी मांडलेल्या यासंबंधीच्या
लक्षवेधी सूचनेनंतर ते बोलत होते.
****
राज्यातल्या धुळे, नंदुरबार,
अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे
आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, जिल्हा परिषदेतलं गट, गण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या
आत आणून त्यानंतर निवडणूक कार्यक्रम राबवावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणी
दरम्यान, न्यायालयानं हे निर्देश दिले, त्यामुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा
मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणासंदर्भातली सुनावणी मात्र या पुढेही सुरू राहील असंही
न्यायालयानं म्हटलं आहे.
निवडणूक आयोगातर्फे जाहीर
कार्यक्रमानुसार या पाचही जिल्हा परिषदांसाठी येत्या सात जानेवारीला मतदान आणि आठ जानेवारीला
मतमोजणी होणार आहे.
****
साहित्य अकादमीचे पुरस्कार
आज जाहीर झाले. मराठी विभागातून कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहाची
यंदा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शाल, ताम्रपत्र आणि एक लाख रुपये
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. नवी दिल्लीत येत्या २५ फेब्रुवारीला समारंभपूर्वक हे
पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असं अकादमीनं जाहीर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळच्या
दुगारवाडी धबधब्यात बुडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला तर अन्य एक तरुणी
आणि तरुणाचा शोध सुरू आहे. मूळ तेलंगणातले आणि सध्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कृषी महाविद्यालयात
शिक्षण घेणारे पाच विद्यार्थी काल त्र्यंबकेश्वर जवळच्या दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी
गेले होते. काल सायंकाळी दोन तरुणी आणि एक तरुण धबधब्यावरून न परतल्यानं, इतरांनी आज
शोध घेतला असता, एका तरुणीचा मृतदेह आढळला. इतर दोघांचा शोध सुरू असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रास्त भाव दुकानातला
साडेतीन क्विंटल गहू बाजारात विक्रीला आणल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या एका रास्त भाव
दुकानाचा चालक तसंच या गव्हाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा
नोंदवण्यात आला आहे. अन्न धान्य वितरण अधिकारी विश्वनाथ दराडे यांनी यासंबंधी तक्रार
दाखल केल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात रंगकाम
करणाऱ्या दोन कामगारांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. वसमत तालुक्यातल्या करुंदा
इथे आज दुपारी हा अपघात झाला. रंगकाम करण्यासाठी वापरत असलेल्या शिडीत वीजप्रवाह उतरून
हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जायकवाडी धरणाच्या कालव्यांची
स्थिती अतिशय वाईट असून, त्यातून पस्तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जातं, असं सिंचन
विभागाच्या सूत्रांनी आज सांगितलं. कालव्यांच्या जाळ्यातल्या सुमारे सत्तर टक्के भागाची
तातडीनं दुरुस्ती करायला हवी असल्याचं या विभागानं म्हटलं आहे. सरकारनं या कालव्यांची
तातडीनं दुरुस्ती करून वाया जाणारं पाणी वाचवावं, असं आवाहन धरण तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे
यांनी केलं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आजच्या
दुसऱ्या सामन्यात भारतानं पाहुण्या संघासमोर ३८८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment