Thursday, 19 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं मुस्लिम परिषद आणि जमाते हिंद संघटनेनं विधान भवनावर मोर्चा नेला. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसह राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले.



 औरंगाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या कायद्याच्या समर्थनार्थ आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता. मात्र, एमआयएम विद्यार्थी संघटना आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला विरोध करत निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिंसाचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखिल भारतीय परिषदेनं हा मोर्चा विनापरवानगी काढल्याचं पोलिंसानी सांगितलं.



 उस्मानाबाद इथं पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या. सांगली इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे स्टेशन चौक परिसरात निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरातही डाव्या आघाडीनं निदर्शनं केली, अमरावती इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या कायद्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली.

****



 येत्या २३ तारखेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिले आहेत. आज नागपूर इथं, शेतकरी कर्तमाफी संदर्भात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. शेतकरी कर्जमाफी कशा स्वरुपात करायची याबाबत एक निश्चित धोरण ठरवून, त्यानुसार कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वीच्या फडणवीस सरकारनं दिलेली कर्जमाफी बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, असा आरोपही पवार यांनी केला.

****



 पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर उद्योगात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा लातूर जिल्ह्यातल्या रेणा साखर कारखान्याला उत्तर-पूर्व विभागातून तांत्रिक कार्य क्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

****



 परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प अंतर्गत, ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेला 2018 सालचा देशातील सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरवण्यात आलं. ग्वाल्हेर इथं राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठात आयोजित १३ व्या वार्षिक राष्ट्रीय आढावा बैठकीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****



 जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या देऊळझरी गावात विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिले आहेत. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शासनानं उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून गावात आरोग्य, वीज, पाणीपुरवठा तसंच शैक्षणिक सुविधा आदी कामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यात जीप आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. उमरगा तालुक्यात जकेकुर गावाजवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. उमरगा मार्गे बसवकल्याणकडे जाणारी जीप आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरची आपसात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 हिंगोली जिल्ह्यातही दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पाईंट नजीक परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नांदेड इथं नेताना मृत्यू झाला.

****



 गावातल्या कमकुवत घटकाच्या सामाजिक तसंच आर्थिक विकासासाठी योजनांची आखणी करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपरिवर्तकाने काम करावे, असे निर्देश बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

*****

***

No comments:

Post a Comment