आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
भारताचे पहिले सीडीएस-
अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती झाली
आहे. जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होत आहेत. तीनही संरक्षण दलांचे प्रमुख
म्हणून काम करताना लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये समन्वय राखणं आणि सैन्यदलाशी संबंधित
सर्व बाबींमध्ये सरकारचा सल्लागार म्हणून काम करणं, या त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या
असतील. संरक्षण मंत्रालय नव्यानं निर्माण करत असलेल्या संरक्षण व्यवहार विभागाचे अध्यक्ष
म्हणूनही ते काम पहातील.
दरम्यान, लेफ्टनंट जनरल
मनोज मुकुंद नरवणे हे आज लष्करप्रमुख पदाची सूत्रं हाती घेत आहेत.
****
पॅन आणि आधार कार्ड जोडणीसाठी
प्रत्यक्ष कर मंडळानं मुदतवाढ दिली आहे. आता
३१ मार्च २०२० पर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडता येणार आहे. मंडळानं
या साठी याआधी जाहीर केलेली मुदत आज संपत होती.
****
राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी
लागू केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं
बँक कर्जखातं आणि बचतखातं त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणं अनिवार्य आहे. ज्या
शेतकऱ्यांचं बँक कर्जखातं किंवा बचत खातं आधार क्रमांकाशी संलग्न नाही, अशा शेतकऱ्यांनी
आपली खाती तत्काळ आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावीत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात
आलं आहे.
****
नांदेड ते अमृतसर सचखंड
एक्स्प्रेस आज दिनांक ३१ डिसेंबरला नांदेड इथून सकाळी साडे नऊऐवजी दुपारी चार वाजता
सुटेल. अमृतसरहून येणारी गाडी उशीरा धावत असल्याने, हा बदल झाल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या
दहापैकी पाच पंचायत समितींमध्ये मध्ये भाजपची सत्ता आली असून तीन ठिकाणी राष्ट्रवादी,
एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी खासदार गटाकडे सत्ता राहिली.
****
भारत-दक्षिण अफ्रिकेदरम्यान,
१९ वर्षांखालील युवांच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, इस्ट लंडनमध्ये
बफेलो पार्क इथं काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून
पराभव केला. मात्र मालिकेतले पहिले दोन सामने जिंकल्यामुळे मालिका भारतानं जिंकली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment