Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** आदिवासी विकास योजनांची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयस्तरावर
वॉर रूम स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
** समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार या
दोन योजनांची श्वेतपत्रिका जारी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
** नागरिकता सुधारणा कायद्याला समर्थन नसल्याचं, हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा खुलासा
आणि
**
लाच
घेताना सरकारी कर्मचाऱ्याला
पकडल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीदेखील चौकशी करण्याचे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आदेश
****
राज्यातल्या आदिवासी विकास योजनांची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयस्तरावर
वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिले आहेत. मुंबईत आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत काल
ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन
राऊत आणि विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी
उपस्थित होते. कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले. कुपोषण निर्मुलनासाठीच्या सर्व निधीचा शंभर
टक्के विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचनाही
मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अनुसूचित जातींप्रमाणे अनुसूचित जमातींसाठीही उच्च
स्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना मंत्री राऊत यांनी यावेळी केली.
****
देशात विभाजनासारखी
स्थिती आणि अराजकतेचं वातावरण असल्याचं, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल बोलताना राऊत यांनी,
देशात हिंसाचाराला प्रेरणा कोणाची आहे ते शोधले पाहिजे, असं नमूद केलं. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३०
तारखेला होईल आणि खातेवाटपावरून आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत काहीही मतभेद नाहीत,
असं राऊत म्हणाले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या
नूतन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजनही काल राऊत आणि ग्राम विकास मंत्री छगन भुजबळ यांच्या
हस्ते झालं. राज्य सरकारनं
दिलेल्या कर्जमाफीचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना लाभ होईल, असा
विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या सरकारनं
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचा फायदा झाला नाही, असं सांगून यंदा नाशिक जिल्ह्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांचा
लाभ होईल, असंही भुजबळ म्हणाले.
****
राज्याची
अर्थव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरलेल्या समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार या दोन योजनांची श्वेतपत्रिका
जारी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं मराठवाडा पदवीधर
मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नागपूर
मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याचं
ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झालेल्या निधीचीही तपासणी करणं गरजेचं असून,
सरकारकडे अशी मागणी करणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
****
नागरिकता सुधारणा
कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं, हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. हिंगोलीत या कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर, पाटील यांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर
करण्यात आलं होतं, हे पत्र बनावट असल्याचा आरोप पाटील यांनी केला
आहे. आपण अन्य एका कामासाठी दिलेल्या पत्राचा गैरवापर करण्यात
आला असून, या प्रकरणी हिंगोली पोलिसांकडे आपण तक्रार दाखल केल्याची
माहिती खासदार पाटील यांनी पीटीआयला दिली.
या कायद्याच्या समर्थन
मोर्चात शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगरही सहभागी झाले होते. मात्र या भूमिकेबाबत त्यांची प्रतिक्रिया
मिळू शकली नसल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या
विरोधात वंचित बहुजन आघाडीनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काल
मुंबईत दादरमध्ये धरणे आंदोलन केलं.
****
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या धर्तीवर
राज्यातल्या मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ
करावीत अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटानं केली आहे. या मागणीसाठी येत्या १० जानेवारीला संपूर्ण राज्यात रिपाइंतर्फे आंदोलन केलं
जाईल, अशी घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केली. या आंदोलनादरम्यान प्रत्येक जिल्हाधिकारी
कार्यालय, तहसील कार्यालयांसमोर निदर्शनं केली जातील अशी माहिती
त्यांनी पत्रक जारी करून दिली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
लाच घेताना सरकारी कर्मचाऱ्याला पकडल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीदेखील चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक
आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. डुंबरे यांनी काल औरंगाबाद परिक्षेत्राला भेट देऊन
अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कनिष्ठ अधिकारी लाच घेताना पकडला
जातो, मात्र त्याच्यामागे आणखी कोण कोण आहे, याची कसून चौकशी करण्याची सूचनाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी गेल्या
वर्षभरातल्या औरंगाबाद विभागाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी
समिती सभापतीपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमितसिंह तेहरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल झालेल्या या पदाच्या निवडणुकीसाठी तेहरा यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल
झाला होता.
****
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर
समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती.
नागरिकत्व सुधारणा कायदा भारतातल्या मुस्लिमांच नागरिकत्व हळूहळू काढून घेईल
का ?
नाही. नागरिकता सुधारणा कायदा कोणताही भारतीय नागरिकाला लागू होत नाही.
सर्व भारतीयांच्या अधिकारांच्या संरक्षणाची राज्यघटना या हमी देते. त्यामुळे हा कायदा कोणत्याही भारतीयाला नागरिकत्वापासून वंचित करणार नाही. हा विशेष कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकत्व देणारा कायदा आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत संविधान
बचाव या मागणीसाठी काल उस्मानाबाद शहरात मुस्लिम समाजानं मूक मोर्चा काढला होता. शहरातल्या गाजी मैदानापासून सुरू झालेला
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
****
ढगाळ हवामानामुळे अनेक ठिकाणी कालचं सूर्यग्रहण
पाहता आलं नाही. ग्रहण पाहण्यासाठी
विशेष चष्मे घेऊन तयारीत असलेल्या खगोलप्रेमींचा यामुळे हिरमोड झाला. लातूर इथं, महापालिका, एम डी ए
फाउन्डेशन आणि रोटरी क्लब मिडटाउन च्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ग्रहण
पाहण्यासाठी चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आलं होतं. जिल्हा क्रीडा
संकुलावर सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. मात्र ढगाळ
हवामानामुळे विद्यार्थ्यांना अल्पावधीसाठीच ग्रहण पाहता आलं, विद्यार्थ्यांनी हा क्षण उत्साहानं अनुभवल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या माळेगाव इथल्या यात्रेत
काल अश्व प्रदर्शन आणि स्पर्धा घेण्यात आली. यात बारामती, अकलूज,
हैद्राबाद, पुणे, नांदेड,
औरंगाबाद, लातूर, परभणी आदी
ठिकाणांवरून आलेल्या ७० अश्वांनी सहभाग घेतला होता. यावेळी घोड्यांच्या
विविध चाली प्रेक्षकांना पहायला मिळाल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी
देवीच्या मंचकी निद्रेस काल संध्याकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. आठ दिवस ही मंचकी निद्रा असून,
तीन जानेवारीला घटस्थापनेनं शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार
आहे.
****
अध्यात्माच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत
प्रबोधन झालं तर ग्रामीण भाग स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात चुडावा ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर
काल ते बोलत होते. शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्या ७० लाभार्थ्यांना
प्रोत्साहन अनुदानाचं वितरण करडखेलकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या २३ व्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ
क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते काल झालं. या समारंभानंतर राज्यपालांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं.
****
पुणे जिल्ह्यातल्या दापोडी इथल्या मिलिटरी
अभियांत्रिकी महाविद्यालयात काल पुल बांधणीच्या सरावादरम्यान पुल कोसळल्यानं दोन जवानांचा
मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. पुलाला आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे ही दुर्घटना
घडली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल आठ तालुक्यातल्या पंचायत
समिती सभापती, उपसभापती पदासाठी
निवड प्रक्रीया पार पडली़. या निवड प्रक्रीयेत कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, सावंतवाडी पंचायत
समित्यांवर भारतीय जनता पक्षाच्या सभापतींची निवड झाली. कुडाळ,
वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन पंचायत समित्यांवर शिवसेना आणि महाविकास
आघाडीचे सभापती, उपसभापती निवडून आले.
****
No comments:
Post a Comment