Thursday, 19 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

आपापसातले गैरसमज राज्य आणि देशहिताच्या आड येऊ नयेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, असा पुनरुच्चार करताना, विधायक विकासकामांना आपण कधीही स्थगिती देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, त्याचसोबत भाजपची पालखी कायम वाहणार नाही, असाही शब्द दिला असल्यामुळे, गेले पंचवीस वर्ष वाहत असलेलं ओझं उतरवून ठेवलं, असं ठाकरे यांनी सांगितलं.

अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या आपल्या आश्वासनाबाबत काहीही उल्लेख केला नाही, असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या गदारोळातच अध्यक्ष नाना पटोले यांनी, अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मतदान घेऊन, प्रस्ताव संमत झाल्याचं जाहीर केलं.

****

शेतकरी कर्जमाफीसंदर्भाच्या मुद्यावर आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात ९३ लाख हेक्टरवरचं क्षेत्र बाधित झालं. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शक्यतेसंदर्भात सर्व मुद्यांवर आजच्या या बैठकीत चर्चा होणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

विदर्भातल्या रुग्णांची सोय होण्यासाठी नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचं कामकाज बंद होतं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील आणि ही समिती त्या रुग्णांना द्यायचं अर्थसहाय्य, विहित निकषानुसार निश्चित करणार आहे. या कक्षाचं कामकाज तात्काळ सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

****

शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये, अशी आपली राजकीय पक्षांना हात जोडून विनंती असल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विद्यार्थी संघटनांमधून होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने त्यांनी हे आवाहन केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पोखरीयाल यांनी, विद्यार्थी हिताला आपल्या सरकारचं प्राधान्य असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदी सरकार रात्रंदिवस काम करत असल्याचं म्हटलं आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘हम भारत के लोग’ या आघाडीअंतर्गत आज निदर्शनं करणार आहे. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लीम लीगसह अनेक लोक सहभागी होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

****

जम्मु काश्मिर इथल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघनं केलं. प्रत्त्युतरादाखलं भारतीय सेनेनंही उखळी तोफांचा मारा केला. यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथं, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस बियाणांची लागवड करण्यात आली. रंगीत कापसाचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. हा रंगीत कापूस केंद्रीय कापूस यंत्र तंत्रज्ञान विभागाला पाठवला जाणार असून यातून नैसर्गिक रंगीत कापड निर्मिती केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्त्तात म्हटलं आहे.

****

गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, गोवा मुक्तीसंग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या सेनानींना आदरांजली अर्पण केली आहे. सशस्त्र सेनेच्या पराक्रमी प्रयत्नांना राष्ट्र नमन करत असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment