Wednesday, 18 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18.12.2019 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

** ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

** अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सदनाचं कामकाज स्थगित; भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्की

**  ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार

आणि

** भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज विशाखापट्टणममध्ये दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

****

आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.

मूळात वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या डॉक्टर लागू यांनी १९६९मध्ये पूर्णवेळ नाट्यसृष्टीत काम करण्यास सुरूवात केली. पुण्यातल्या पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा नाटकात प्रवेश झाला. त्यानंतरच्या काळात डॉ. लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं.

वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका होती. डॉ. लागू यांनी आपल्या कारर्किदीत जवळपास ५० हून अधिक नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्या. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या चित्रपटातल्या मास्तरच्या अभिनयानं ते मराठी चित्ररसिकांच्या घराघरात पोहोचले. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ सुगंधी कट्टा या चित्रपटातल्या अभिनयानंही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मराठी बरोबरच घरोंदा, लावारिस. अग्निपरीक्षा, कामचोर, इन्कार, काला बाजार, किशन कन्हैय्या, गांधी, घुंगरू की आवाज यासही काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं. लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरवसह अनेक पुरस्कारही मिळाले.

अभिनयासोबतच लागू यांनी काही पुस्तकंही लिहीली. त्यात झाकोळ, रूपवेध, लमाण या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय विषयांवरही त्यांनी सडेतोड भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले. विज्ञानवादी विचारसरणीचे असलेल्या लागू यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतच्या कामातही सक्रिय सहभाग घेतला. देव या संकल्पनेबाबत स्पष्ट भूमिका घेत ‘देवाला रिटायर करा’ नावाचा लेखही त्यांनी लिहिला होता.

त्यांचा मुलगा तन्वीर लागू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार सोहळा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला.

डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांना चित्रपटसृष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे. 

त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रूपये नुकसान भरपाई देऊन सरकारनं दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी करत, नियम ५७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी, सभागृहात झालेल्या घटनेबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांना समज देऊन, पुढे अशा प्रकारची वर्तवणूक न करण्याची सूचना केली. या गोंधळातच सभागृहात चार विधेयकं संमत झाली.

विधान परिषदेतही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला कोंडीत पकडलं. त्यामुळे झालेल्या गोंधळात विधान परिषदेचं कामकाजही तीनवेळा तहकूब करण्यात आलं. चौथ्यांदा विधानसभेच्या उपसभापती निलग गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

दरम्यान, कामकाज स्थगित झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विरोधी पक्षांनी परंपरेला काळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं.  जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरातली अशांतता आणि देशभरातल्या हिंसक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात टीका करताना त्यांनी, जामिया इस्लामियामध्ये जे घडलं ते जलियानवाला बाग घटनेसारखं असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी, केंद्राकडून राज्याकडे मदत येणं गरजेचे असल्याचं नमूद केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशननं साहित्यातल्या योगदानाबद्दल दिले जाणारे वर्ष २०१९चे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे स्मृति -साहित्य जीवनगौरव सन्मान देण्यात येणार आहे. कृष्णात खोत यांना "रिंगाण" या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांना 'हंडाभर चांदण्या' या नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार तर नितीन रिंढे यांना 'लीळा पुस्तकांच्या' या ग्रंथासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. 

****

नागरिकत्व सुधारणा कायदा परत घ्यावा या मागणीसाठी काल नांदेड शहरात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया -`एस एफ आय तर्फे निदर्शनं करण्यात आली. या विधेयकाविरोधात जामिया मिलीया विद्यापीठात विद्यार्थी निदर्शंनांवेळी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही या कायद्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात लातूर इथं काल आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही याप्रकरणी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

****

औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशननं औरंगाबाद इथं काल सेवानिवृत्ती दिन साजरा केला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत हरीश्चंद्र जोशी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारानं जिल्ह्यातल्या अकरा सेवा निवृत्तांचा गौरव करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथले पोलिस नाईक भानुदास पवार यांच्याविरुद्ध दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या करंजळा इथं काल दुपारी ट्रॅक्टरखाली दबून कृष्णा वाघुंडे या तरुणाचा मृत्यू झाला. जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चढावर ट्रॅक्टर अचानक उलटल्यानं ही दुर्घटना घडली.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. चेन्नई इथं झालेला पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं घरकुल धारकांना नियमानुसार वाळू मिळत नसल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केलं. घरकुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असूनही अद्याप घरकुलधारकांना पैसे मिळाले नाही, ते तात्काळ देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. 

****

नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामातली अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली असून, यंदा पन्नास टक्के पेक्षा आणेवारी कमी आली आहे. या आणेवारीचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास पाठवण्यात आला आहे. नांदेड तालुक्यात सर्वात कमी ४४, तर अन्य १५ तालुक्यात ४७ ते ४८ टक्के आणेवारी उतरली आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं असून, याचा परिणाम आणेवारी घसरण्यावर झाला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तुती लागवड करून रेशीम शेतीकडे वळावं, जिल्हा प्रशानातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलं आहे. लातूर तालुक्यातल्या गोंदेगाव  इथं रेशीम शेतीला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या मसईतांडा इथं काल दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरांना आग लागली. आगीच्या या घटनेत भानुदास शेलार यांच्या घरासह अन्य तिघांच्या घरातले जीवनावश्यक साहित्य, दागिने तसंच रोख रक्कम जळाल्यानं सुमारे १५ लाख रूपयांचं नुकसान झालं.

****

जालना जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी अवैध सावकारी करणाऱ्यांवर तिघांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर दस्ताऐवज जप्त केले. अंबड तालुक्यातल्या सुखापुरी आणि रेवलगाव इथं हे तिघे सावकारी करत होते. त्यांच्याकडून जमिनी खरेदी व्यवहार, बाँड, धनादेश, रोख व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायऱ्या आदी दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत. या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल, असं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं.

****




No comments:

Post a Comment