▼

Sunday, 15 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 15.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा.

****

न्याय व्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे. काल नागपूरमधे उच्च न्यायालय वकील संघटनेच्या वतीनं माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी बोबडे बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं सेंकदला दहा लाख शब्द वाचले जाऊ शकत असल्यानं पुरावे आणि कागदपत्रांच्या वाचनाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढून न्याय प्रक्रिया सुलभ व्हायला मदत होईल, असं ते म्हणाले. मात्र, मानवी बुद्धीनं दिल्या जाणा-या निर्णयप्रक्रियेला कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय ठरु शकत नाही असा खुलासाही सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी यावेळी केला.

****

मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिका-यांना दिल्या आहेत. ते काल मुंबईत पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या पोलिस अधिका-यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पोलिस आयुक्तसंजय बर्वे उपस्थित होते. ठाकरे यांनी आयुक्तालयातल्या २४ तास कार्यरत असणा-या नियंत्रण कक्षाची पाहणी केली. या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी पोलिस अधिका-यांना दिल्या आहेत.

****

मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे इतर पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत मेट्रो-३ प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदान इथून भुयारी मार्गानं प्रवास करत काळबादेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भुयारी मार्गाची पाहणीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांनी यावेळी केली.

****

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्वरित विजय मिळवण्याच्या दृष्टीनं तंदुरुस्त सैन्यदलांच्या उभारणीवर भर दिला आहे. ते काल मुंबईत मनोहर पर्रिकर यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका दिवसेंदिवस वाढतच असून प्रत्येक नागरिकानं राष्ट्रीय सुरुक्षेत सहभागी असलं

पाहिजे असंही लष्कर प्रमुख रावत म्हणाले.

****

सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज स्मृतीदिन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांचा देशसेवेसाठी त्याग पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळंत राहील, असं मोदी यांनी एका संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह, माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे.  

****

विविध आंदोलनात दगडफेक तसंच अन्य बेकायदेशीर कारवायांमधल्या किशोरवयीन बालकांच्या वापर आणि सहभागांबद्दल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी केल्या जाणा-या काही आंदालनामधे दगडफेक तसंच इतर बेकायदेशीर कारवायांमधे बालकांचा वापर केला जात असल्याचं निदर्शनाला आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. बालकांचा असा वापर करणं बालहक्क आणि संरक्षण कायदा २०१५ चं उल्लंघन असल्याचं आयोगानं म्हटलं आहे,

****

उस्मानाबाद इथं `पाणी वाचवा - जीवन वाचवा` या संकल्पनेवर आधारित मॅरेथॉन स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उस्मानाबादच्या शेकडो महिला, पुरुष, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. एकवीस किलोमीटर, दहा किलोमीटर, पाच किलोमीटर अशा तीन गटांत ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदींचा या उस्मानाबाद मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांत समावेश होता. 

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगड तालुक्यातल्या पाच विद्यार्थ्यांना वेदनाशामक इंजेक्शनचा दुष्परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. येथील शाळांमधे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली, त्यानंतर काही विद्यार्थ्यांवर गडहिंग्लज इथल्या उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

****

भारत आणि वेस्टइंडिजमधे होत असलेल्या ३ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज चेन्नई होत आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****






No comments:

Post a Comment