Tuesday, 17 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेचं कामकाज गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज प्रारंभी अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. भाजप आणि शिवसेना सदस्यां दरम्यान यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याची घटना पुन्हा घडू नये, हा प्रकार अशोभनीय असून असे प्रकार होता कामा नये, असं विधानसभा अध्यक्षांनी यावर म्हटलं. मुख्यमंत्र्यांसमोर फलक फडकवण्यात आला त्याबद्दल त्यांनी सदस्यांना समज दिली. सभागृह व्यवस्थित चालवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, असं आवाहनही विधानसभा अध्यक्षांनी यावेळी केलं. कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विरोधी पक्ष सदस्यांची घोषणाबाजी सुरू राहिली. गदारोळ वाढत गेल्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानपरिषदेचं कामकाजही गोंधळामुळे पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.  

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती, त्याची पूर्तता करण्याची मागणी आपण केली, असं फडणवीस यांनी या संदर्भात नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शेतकऱ्यांचा विश्र्वास घात झाला असल्यानं याचा धिक्कार म्हणून हा मुद्दा लावून धरला, असंही फडणवीस म्हणाले.

****

वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे. त्या काल दूरदृष्य प्रणालीद्वारे भारतीय आर्थिक मेळाव्याला संबोधित करत होत्या. करसंकलनात घट आल्यानं परताव्याची रक्कम द्यायला उशीर झाला, त्यात राज्यांनी काळजी करावी असं काही नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तसंच उपभोक्त्यांकडून मागणी घटल्यानं कर संकलन कमी झालंय. ते वाढवण्यासाठी केंद्र तसंच प्रत्येक राज्याच्या महसूल विभागानं नेटानं प्रयत्न केले पाहिजेत, असं त्या म्हणाल्या. सरकार वस्तू आणि सेवा कराचे दर कमी करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक प्रभागरचनेनुसार घेण्यास आणि प्रभागरचनेनुसार वॉर्डांचं आरक्षण काढण्यास राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचं पत्र काल महापालिका आयुक्तांना प्राप्त झालं. महापालिका निवडणुकीकरता सोडत काढणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती आणि सूचना मागवणे, ही प्रक्रिया रद्द करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन द्राक्षांच्या बागांवर या वातावरणाचा विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यात द्राक्ष बागांचं क्षेत्र आठशे हेक्टरहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

****

औरंगाबाद आणि लातूर इथंही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून गारवा वाढला आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध म्ह‍णुन नाशिक इथल्या भाजप युवा मोर्चानं आज  विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन केलं. भाजप शहर कार्यकारणीच्या वतीनं काल या मुद्दावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणं आंदोलन करण्यात आलं होतं.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर गावात डांगी जातींच्या वळुंचं राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्यात आलं. या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांतून खरेदी विक्रीबरोबरच देशी, विदेशी आणि डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी हजारो शेतकऱ्यांनी आपले वळू आणले होते. अकोले तालुक्यातील सोमलवाडी इथले सोमा गंभीरे यांचा दोन दाती वळू यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेता ठरला. वळूंचं असं प्रदर्शन भरवण्याची इथं  ५८ वर्षांची परंपरा आहे.

****

महिलांच्या सतरा वर्षाखालच्या फुटबॉल स्पर्धेत आज मुंबईत भारत आणि थायलंड यांच्यात लढत होणार आहे. अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.

****


No comments:

Post a Comment