आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ डिसेंबर २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
सातारा
जिल्ह्यात कोयना खोऱ्याला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची
तीव्रता दोन पूर्णांक सहा दशांश एवढी नोंदवली गेली. सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास
झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. सुदैवानं या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
****
सरकारनं
शेतकऱ्यांचं फक्त थकित कर्ज माफ करुन त्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका विधानसभेतले
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, ते आज सकाळी कोल्हापुरात पत्रकार
परिषदेत बोलत होते. अवकाळी पाऊस ग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची अधिक गरज होती मात्र,
ते या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार असल्याचं, फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी
सात-बारा कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण करायला हवं, अशी मागणी त्यांनी केली.
****
झारखंड
विधानसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती आले असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
३० जागांवर आघाडीवर आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा २२, काँग्रेस तेरा तर राष्ट्रीय जनता
दलाचे उमेदवार पाच जागांवर आघाडीवर आहेत.
****
६६वे राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते
प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी
दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. आयुष्मान खुराना
आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून, तर कीर्ती सुरेश या तेलुगु अभिनेत्रीला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. उरी चित्रपटासाठी आदित्य
धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जाईल. ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. ‘नाळ’ या चित्रपटातला
बालकलाकार ‘श्रीनिवास पोफळे’ याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि याच चित्रपटासाठी सुधाकर
रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment