Tuesday, 24 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहरं उघड्यावर शौचापासून मुक्त शहरं म्हणून घोषित केली आहेत. यापैकी ४ हजार १६७ शहरांची बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी करून, ती शहरं उघड्यावर शौचापासूप मुक्त असल्याचं प्रमाणित केलं आहे.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुमारे ६५ लाख ८१ हजार व्यक्तिगत, तर ५ लाख ८९ हजार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत.

****

देशांतर्गत हवाई प्रवासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या उडान या योजनेचा आतापर्यंत देशभरातल्या ३५ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये ही योजना सुरु झाली होती. या योजनेमुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठी बचत झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. पर्यटकांसाठी, तसंच आपत्कालीन वैद्यकीय स्थितीतही उडान योजना उपयोगी ठरल्याचं दिसून आलं आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये एका पाकिस्तानी मुस्लीम महिलेला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलं आहे. खतिजा परवीन असं या महिलेचं नाव असून, भारतीय नागरिक असलेल्या मोहम्मद ताज यांच्याशी विवाह केल्याच्या आधारे त्यांना नागरिकता कायदा १९५५ अनुसार नागरिकत्व देण्यात आलं. पूंछ जिल्ह्याचे विकास आयुक्त राहुल यादव यांनी त्यांना यासंबंधीचं प्रमाणपत्र प्रदान केलं.

****

नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनात हिंगोली शहरात आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नागपूर इथल्या अरुण जोशी यांची सलग दहाव्यांदा मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात प्रामुख्याने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेला वाडा दत्तक घेणे, लडाख येथे सावरकरांच्या नावे गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करणे अशा मोठ्या निर्णयांचा यात समावेश आहे.

****

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी परवा गुरुवारी निवडणूक होत आहे. औरंगाबादचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. स्थायी समितीवर १६ पैकी १५ सदस्य काँग्रेसचे आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी येत्या ६ जानेवारीला निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. सभापती आणि उपसभापती यांची अडीच वर्षाची मुद्दत २० ऑगस्ट २०१९ रोजी संपली होती, मात्र राज्य विधानसभा निवडणुकीमूळे या पदांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

****

रायगड जिल्हात चंदनाची विक्री करताना काल पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रूपये किंमतीचं ६० किलो चंदन जप्त करण्यात आलं आहे. श्रीवर्धन तालुक्यात बोर्ली पंचतनजवळ काही तस्कर चंदनाची विक्री कऱण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि वनखात्याने संयुक्त कारवाई करून या तिघांना अटक केली.

****

अमरावती जिल्ह्यात पणन महासंघाने सुरू केलेल्या शासकीय केंद्राकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. या शासकीय केंद्रांवर बाजार भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आपला कापूस खुल्या बाजारात विकत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आंततराष्ट्रीय क्रिकेट मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. वेस्ट इंडीजसोबत नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानं, या दोघांचं स्थान अबाधित राहिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. राहुलने अट्ट्याऐंशीव्या क्रमांकावरून एक्काहत्तराव्या तर श्रेयस एकशे चाराव्या क्रमांकावरून एक्क्याऐंशीव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

महिला क्रिकेट क्रमवारीत भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव गोलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीप्ती शर्मा पाचव्या तर पूनम यादव सहाव्या स्थानावर आहे.

****


No comments:

Post a Comment