Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
करण्यासाठीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी आधारित उद्योग आणि शेतीसोबत जोडधंद्यांवर
जोर द्यावा लागेल असं उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या
आनंद इथं ग्रामीण व्यवस्थापन संस्थेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. कृषीव्यवस्थेमधे
तंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. देश तीन ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडं
वाटचाल करत असून हे ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामीण व्यवस्थेचे योगदान अतिशय महत्वाचं
असल्याचं नायडू यावेळी म्हणाले.
****
काँग्रेस
नेते राहूल गांधी यांनी संसदेत केलेल्या ’रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून माफी मागण्यास
नकार देत आपण सावरकर नसून गांधी असल्याचं सांगत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नागरी सुधारणा
विधेयक आणि विविध मुद्द्यांच्या निषेधार्थ कॉंग्रेसनं नवी दिल्लीत रामलिला मैदानावर
भारत बचाव सभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला आर्थिक संकटांच्या खाईत लोटलं असल्याचा आरोपही त्यांनी
यावेळी केला. भारताच्या शत्रू राष्ट्रांना भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त व्हावी असं
वाटत असताना पंतप्रधान मोदी ते काम एकट्यानेच करत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी माजी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील पंतप्रधान मोदी गेल्या सहा वर्षांपासून लोकांना
खोटी आश्वासनं देत असून ती फोल ठरली असल्याचा आरोप केला.
दरम्यान,
राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षानं आज औरंगाबादसह ठिकठिकाणी निषेध
व्यक्त करण्यात आला.
****
टोल नाक्यावर टोल देण्यासाठी गाड्यांना फास्टॅग किंवा
प्रिपेड रिचार्ज करता येऊ शकणारा टॅग उद्यापासून बंधनकारक करण्यात आला आहे. या प्रिपेड
रिचार्ज टॅगमुळं टोलनाक्यांवर शुल्क आपोआप दिले जाणार आहेत. ही सुविधा उद्या सकाळी
आठ वाजेपासून सुरु होणार आहे. टोल नाक्यांवर गाडी धारकांचा वेळ आणि गाड्यांचं इंधन
वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या टॅगमुळं टोल नाक्यांवर टोल देण्यासाठी
गाड्या थांबवण्याची गरज पडणार नाही. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोल
नाके इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टमनं सुसज्ज केली आहेत.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील
काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली
आहे. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खातं जयंत पाटील यांना तर, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि
कल्याण हे खातं छगन भुजबळ यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे.
****
श्री क्षेत्र
वाराणसी इथं होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लातूर
जिल्ह्यातल्या चाकूर इथले वीरशैव संत साहित्याचे गाढे अभ्यासक शांतीतीर्थ स्वामी यांची
निवड करण्यात झाली आहे. निवृत्त मुख्याध्यापक शांतीतीर्थ स्वामी यांचे १० ग्रंथ प्रकाशित
झालेले आहेत. त्यांनी कपिलधार या मासिकाचे अनेक वर्ष संपादन केलेलं आहे. हे संमेलन येत्या ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान वाराणसी इथं होणार आहे.
****
उस्मानाबाद
इथं जानेवारीमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालन उभारणीचा
आज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,
ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव, वेदकुमार वेदालंकार, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर यावेळी उपस्थित होते. जवळपास २५० दालनांच्या या
ग्रंथ दालनात देशभरातले ग्रंथ विक्रीसाठी येणार आहेत. याशिवाय सभा मंडप उभारणी आणि
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांचे स्वरूप अंतिम होत आहे. एकाच वेळेस तीन सभामंडपांमध्ये
वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यात उद्घाटन, समारोप, दोन सांस्कृतिक कार्यक्रम,
तीन कविसंमेलन, पाच परिसंवाद, कथा लेखकांशी संवाद, कथाकथन आणि शाळकरी मुलांसाठी बालकुमार मेळाव्याचे
आयोजन या साहित्य संमेलनात करण्यात आलं असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे कार्यवाह
श्री रवींद्र केसकर यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या सावळी ते घडोळी मार्गे
अवैध रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पकडण्यात आले.
अवैध रेतीची वाहतुक रोकण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून त्याअंतर्गत विविध भागात
गस्त घातली जात आहे. या भागात गस्त घातली जात असतांना हे ट्रक पकडले गेले.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या राहुरी कारखाना ते श्रीरामपूर रस्त्याचं रखडलेलं काम निविदेप्रमाणे लवकर
पूर्ण करावं, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीनं देवळाली प्रवरा चौकात धरणे आंदोलन
करण्यात आलं. पुढील काळात या मार्गावर अपघात झाल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग
आणि ठेकेदाराला जबाबदार धरुन गुन्हे दाखल करण्यात
येतील असा इशारा आंदोलकर्त्यांनी यावेळी दिला.
****
No comments:
Post a Comment