Wednesday, 1 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 January 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००

****



 संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, असं म्हणणाऱ्या राज्यांनी हा निर्णय घेण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा, असंही प्रसाद यांनी म्हटलं आहे.

****



 देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं आज परवानगी दिली. मात्र, संबंधितांना या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी न्यायालयानं आपल्या या आदेशाला येत्या अठरा तारखेपर्यंत स्थगितीही दिली आहे.

****



 जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा भागात भारतीय सेनेचे संदीप रघुनाथ सावंत आणि अर्जुन थापा मगर दोन सैनिकांना वीरमरण प्राप्त झालं. आज सकाळी या भागात सुरू असलेल्या एका शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली.

****



 शौर्यदिनानिमित्त आज कोरेगाव भीमा इथे विजय स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसंच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले या नेत्यांनीही शौर्यस्तंभाला अभिवादन करत शहिदांना आदरांजली वाहिली.

****



 नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय नागरिकांसाठी नसून, पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असं भारतीय जनता पक्षाचे खासदार सत्यपाल सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.या कायद्याबाबत काही पक्ष अफवा पसरवत असल्याचं ते म्हणाले.

****



 नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत ७०० रुपयांनी घसरण झाली. आज कांद्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार सातशे रुपये भाव मिळाला. राज्यातल्या सगळ्या बाजार पेठांमध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यानं,तसंच कांदा पुरेसा परिपक्व नसल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घट दिसून येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 कारवरचं नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या विहिरीत  कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. औरंगाबाद शहरालगतच्या देवगिरी किल्ल्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला. नववर्षाची पार्टी करून परतताना अपघात झालेल्या या कारमधल्या पाच मित्रांपैकी तीन जणांना  स्थानिकांनी वाचवलं मात्र सौरभ नांदापूरकर आणि विर्भास कस्तुरे या दोघांचा यात मृत्यू झाला.

****



 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या पदविका आणि पदवीधारकांसाठी एका विशेष उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यानं होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी परवा, म्हणजे तीन तारखेपर्यंत औरंगाबादच्या उद्योजकता विकास केंद्रात नोंदणी करावी, असं संयोजकांनी कळवलं आहे.

****



 सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी  उदय कबुले यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप विधाते यांची आज बिनविरोध निवड झाली. कबुले आणि विधाते हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आहेत.

****



 या महिन्यात उस्मानाबाद इथे होणाऱ्या त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या गीताचं आज लोकार्पण करण्यात आलं. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते आज आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून गीताचं लोकार्पण झालं. साहित्य संमेलनाची माहिती जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रानं ”जागर साहित्याचा” ही विशेष मालिका आजपासून सुरू केली आहे.

****



 वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या तेरा आदिवासी गावांमध्ये वन धन केंद्रांची निर्मिती  होत आहे. या प्रत्येक वन धन केंद्रात तीनशे  आदिवासी महिला पुरूषांना काम करण्याची मान्यता मिळाली आहे. जंगलात दरवर्षी येणारा रानमेवा गोळा करण्याचं काम आदिवासींना देऊन त्यातून त्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन ही केंद्रं उभारत आहे.

****



 डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष या आघाडीतून बाहेर पडला आहे. या पक्षाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

*****

***

No comments:

Post a Comment