Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर
२०१९ ते मार्च २०२० या काळातला दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता पंतप्रधानांनी आज जारी
केला. सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा झाला. कर्नाटकात
तुमकूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी हा निधी जारी केल्याचं जाहीर केलं
आहे. आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी प्रमाणपत्रं
प्रदान केली. या योजनेअंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी दरवर्षी
सहा हजार रुपये मदत तीन टप्प्यात दिली जाते.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह आज नागपूर इथं, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा परिसर राष्ट्राला अर्पण
केला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अकादमीची पायाभरणीही शाह यांच्या हस्ते आज करण्यात
आली. अग्निशमन सेवा आणि आपत्ती निवारण हे विभाग आतापर्यंत दुर्लक्षित राहिले, मात्र
देशाला पाच त्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी या सेवा अधिकाधिक सक्षम करणं आवश्यक
असल्याचं गृहमंत्री म्हणाले, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित
करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेतलं कर्जखातं आणि बचतखातं
आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी
केलं आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेत
महाविकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले
यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनिष
आखरे यांची निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कोल्हापूर
जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत, महाविकास आघाडीकडून
काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील
उपाध्यक्षपदी निवडून झाली आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते माजी खासदार डि पी त्रिपाठी यांच्या निधना बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्रिपाठी यांच्या निधनामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला
उत्तम संसदपटू आपण गमावला, अशी भावना कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्रिपाठी यांच्या
निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिाया
सुऴे यांनीही दुख: व्यक्त केलं. त्रिपाठी यांचं आ़ज दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन
झालं, ते ६७ वर्षांचे होते.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ
यांच्या पार्थिव देहावर आज अहमदनगर इथ अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यापूर्वी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुजय विखे, आमदार सुधीर तांबे, आमदार
संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी वाघ यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
कृतिशील जीवन जगलेले वाघ यांच्या स्मृती चिरंतन राहतील, या शब्दात पवार यांनी त्यांना
श्रद्धांजली अर्पण केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
परंड्याचे आमदार डॉ तानाजी सावंत यांना मंत्रिमंडऴात स्थान न मिऴाल्यानं उस्मानाबाद
इथं शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आज खासदार ओमराजे निंबाऴकर यांच्या कार्यालयात
बैठक झाली. सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी
करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके यांच्यासह
पदाधिकारी उपस्थित होते.
****
भारतीय कापूस निगम अर्थात
सीसीआयच्या माध्यमातून जालना आणि बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आजपर्यंत एकूण
८६ हजार ७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयकडून कापसाला साडेपाच हजार
ते पाच हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात येत असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या
खात्यावर ४५ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही कापूस खरेदी मार्चपर्यंत सुरू
राहणार असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस खरेदीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती
कारागृहात आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत अठरा कैद्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी
पदवी प्रवेश परीक्षा दिली. कारागृहाच्या शिक्षण विभागात अनेक कैदी, टिळक मुक्त विद्यापीठ,
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कैद्यांच्या भावी
जीवनासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षणाचा लाभ होत असल्याचं कारागृहाचे अधीक्षक
हिरालाल जाधव यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment