Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 04 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०४ जानेवारी २०२० दुपारी
****
तांत्रिक समाधानाचा शोध आणि प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञान
आणि तार्किक विचारसरणीची आवश्यकता
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बंगळुरूमधे १०७ व्या भारतीय
विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या
कामगिरीवरच देशाच्या विकासाचा डोलारा अवलंबून असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी यावेळी
विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन, त्याचे पेटंट, निर्मिती आणि भरभराट या चतु:सूत्रीवर
भर देण्याच आवाहन केलं. देशातले शास्रज्ञ यशस्वी अवकाश मोहिमेनंतर समुद्र मोहिमेवरही
भर देतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. २०२२ पर्यंत देशातली तेल आयात
१० टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसंच डिजीटल तंत्रज्ञान, इ-वाणिज्य,
इंटरनेट बँकींग आणि मोबाईल बँकींग सेवेमुळं ग्रामीण भागातल्या जनतेलाही मोठा फायदा
होत असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
पाकिस्तानमधल्या नानकाना साहिब इथं गुरुद्वारामध्ये
करण्यात आलेल्या तोडफोडीचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारतानं पाकिस्तान
सरकारला शिख समुदायाच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचं आवाहन
केलं आहे. नानकाना साहिब गुरुद्वारामध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीनं भारत चिंतीत असल्याचं
परराष्ट्र व्यवहार विभागानं म्हटलं आहे. गुरु नानकदेवजी यांचं जन्मस्थान असलेल्या पवित्र
नानकाना साहिब शहरात शीख अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्यात येत असून या विरोधात कडक
कारवाई करण्यात यावी अशी मागणीही परराष्ट्र व्यवहार विभागानं केली आहे.
****
जम्मू आणि काश्मीर मधल्या
श्रीनगर इथं आज लष्कर ए तैयबाचा एक दहशतवादी पकडला गेला आहे. निसार अहमद डार असं या
दहशतवाद्याचं नाव आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष मोहिमे अंतर्गत या दहशतवाद्यास
एका रुग्णालयातून पकडण्यात आलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिवसेनेचे आमदार अब्दुल
सत्तार यांनी आज मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. पक्षानं कॅबिनेटमंत्रीपद
न दिल्यानं आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद
निवडणुकीत कांग्रेसला पाठिंबा
दिल्यामुळं सत्तार यांनी राजीनामा दिल्याची
माहिती समोर येत आहे. ३० डिसेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारच्या २६ कॅबिनेट आणि दहा
राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची मनधरणी
करण्याचा प्रयत्न केला असून त्यामध्ये त्यांना यश आलं नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सत्तार यांच्या राजिनाम्याबाबत आपणास माहिती नसल्याचं
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात येत्या ९ ते
१२ जानेवारी दरम्यान, विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात
आलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम शिरसाठ यांनी ही माहिती
दिली. या व्याख्यानमालेत पत्रकार गिरीश कुबेर, प्रख्यात लेखक गणेश देवी, आणि फासे पारधी समाजातल्या
बालकांच्या शिक्षणासाठी प्रयत्नरत असणारे मतीन भोसले यांची व्याख्यानं
होणार आहेत. तसंच महाविद्यालयात येत्या सहा आणि सात जानेवारीला
राज्यस्तरीय भक्तीगीत गायनाची स्पर्धा होणार असल्याचंही प्राचार्य शिरसाठ यांनी सांगितलं.
****
येत्या ७ ते ९ जानेवारी दरम्यान पुणे इथं राष्ट्रीय
परिषद आणि आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहे . भारतीय कृषि अभियांत्रिकी संस्था, डॉ.
आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी-तंत्रज्ञान महाविद्यालय आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले
कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा
फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच असा आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार असल्याचं
विद्यापीठातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं २०१९ वर्षात
महत्वपूर्ण कामगिरी करत १० हजार ८५५ किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण केलं असल्याचं म्हटलं
आहे. तसंच २०१८-१९ मध्ये रस्त्यांची लांबी ही पाच हजार ४९४ किलोमीटरनं वाढवण्यात आली
असल्याचं मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच महामार्ग हे वाहनधारकांसाठी अधिकाधिक
सुरक्षित करण्यासाठी देखील मंत्रालयानं अनेक उपाययोजना केल्या असल्याचं मंत्रालयातर्फे
सांगण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment