Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १८
जानेवारी
२०२० दुपारी ०१.०० वाजता
****
भारतीय टेनिसपटू सानिया
मिर्झानं मोठ्या विश्रांतीनंतर यशस्वी पुनरागमन करताना होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस
स्पर्धेचं महिला दुहेरीचं अजिंक्यपद जिंकलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत तब्बल
दोन वर्षांच्या खंडानंतर टेनिस कोर्टवर उतरलेल्या सानियानं युक्रेनच्या जोडीदारासोबत
खेळताना चिनी प्रतिस्पर्धी जोडीला सहा -चार,
सहा-चार असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं.
रोम रँकिंग सेरीज कुस्ती
स्पर्धेत भारताच्या विनेश फोगाटनं त्रेपन्न किलो वजनगटात सुवर्ण पदक जिंकलं आहे. तिनं
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इक्वाडोरच्या लुईसा वेलवर्ड हिचा चार शून्य असा पराभव
केला.
****
राज्यातल्या संकटग्रस्त
शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या
शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारताला मागच्या वर्षभरात
दहा लाख ब्याण्णव हजारहून जास्त परदेशी पर्यटकांनी भेट दिली. ही संख्या येत्या पाच
वर्षात दुप्पट करण्याचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंह पटेल
यांनी सांगितलं आहे.सरकार पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं सांगत, पर्यटनदृष्ट्या
महत्त्वाच्या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर सरकार काम करत असल्याचं
पटेल यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या गृह
विभागाच्या वतीनं सोलापूर मध्ये राज्यातली पाचवी लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा
अर्थात फोरेन्सिक लॅब सुरु करण्यात आली आहे.
राज्यात आठ ठिकाणी प्रादेशिक फोरेन्सिक प्रयोगशाळा आहेत, तर चंद्रपूर, रत्नागिरी,
धुळे, ठाणे आणि सोलापूर या पाच ठिकाणी लघु प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात
आली होती. यापैकी चार ठिकाणी याआधीच प्रयोग शाळा सुरु झाल्या असून, सोलापूरच्या प्रयोगशाळेचं
काल उद्घाटन झालं.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ
लसीकरण मोहिम उद्या रविवारी १९ जानेवारीला संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. औरंगाबाद
इथं महापालिकेची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठेत ही लस
देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद इथे महात्मा
गांधी मिशन शिक्षण संस्थेच्या महागामी संगीत अकादमीमध्ये सुरू असलेल्या शारंगदेव महोत्सवामध्ये
आज मणिपूर आणि आसामच्या नृत्य संगीत अकादमींतर्फे सादरीकरण झालं. यात इंफाळच्या जवाहरलाल
नेहरू नृत्य अकादमीनं नट संकीर्तनाची माहिती दिली, तर आसामच्या माजुली उत्तर कमलबारी
सात्रा शंकरदेव कृष्टी संघाच्या वतीनं गायनबायनाची माहिती देण्यात आली.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी
इथल्या एका गोदामातून सुमारे पावणेतीन कोटी रुपये किमतीचा गुटका, पान मसाला आणि इतर
प्रतिबंधित तंबाखू उत्पादनं जप्त करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी आज
दिली. यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या
पथकानं परवा रात्री या गोदामावर घातलेल्या धाडीनंतर ही कारवाई करण्यात आली.
****
फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत
आज वाशीम इथे सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं.युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या
अखत्यारीतल्या नेहरू युवा केंद्राच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या नागपूर- तुळजापूर राज्य मार्गाच्या
चौपदरीकरणाच्या कामासाठी घाट रस्त्याचं रुंदीकरण
होत असून, यामुळे या घाटात दरडी कोसळत आहेत. काल संध्याकाळी दरड कोसळल्यानं एका कारचं
नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
युद्धामध्ये दिव्यांग झालेले किमान वीस लष्करी कर्मचारी
उद्या मुंबईत होत असलेल्या मुंबई मॅराथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. वॉर वुंडेड
फाऊंडेशन, या संस्थेचे उपाध्यक्ष मेजर जनरल इयान कार्डोझो, यांनी आज ही माहिती दिली.
येत्या प्रजासत्ताकदिनी
राजपथावरच्या पथ संचलनासाठी नवी दिल्लीत सराव शिबिर सुरू झालं असून, महाराष्ट्रातल्या
राष्ट्रीय सेवा योजना-एनएसएस च्या चौदा विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड झाली आहे.
औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचा विद्यार्थी रवी जामनिक याचा निवड झालेल्या
विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment