Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02
January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** शिवसेना, काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खातेवाटपाबाबतची चर्चा
पूर्ण; सर्व मंत्र्यांची खाती आज जाहीर होण्याची शक्यता
** विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत
प्रति सिलेंडर १९ रुपयांची वाढ
** डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडीतून बाहेर
आणि
** उस्मानाबादच्या नियोजित
त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीताचं लोकार्पण
****
राज्यातल्या मंत्रिमंडळाचं
खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र
विकास आघाडीच्या सरकारमधल्या
शिवसेना, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल खातेवाटपाला अंतिम रुप देण्यासाठी बैठक
घेतली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
खातेवाटपाबाबत वार्ताहरांशी बोलतांना यासंदर्भातली चर्चा पूर्ण झाली असून आज संध्याकाळपर्यंत
मुख्यमंत्री मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील, असं सांगितलं.
दरम्यान, राज्यातल्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांमधे
खाते वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही असं कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यातला वस्तू
आणि सेवा कर महसूल कसा वाढवता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या एकोणीस कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची
जामिनावर सुटका करण्यात आली. थोपटे
यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या
पुण्यातल्या कार्यालयात काल तोडफोड केली होती.
दरम्यान, कोल्हापूरचे कॉंग्रेसचे आमदार
पी. एन. पाटील यांनाही कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. काल पाटील समर्थकांचा मेळावा फुलेवाडी इथं पार पडला. या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
यांच्याकडे सामुहिक राजीनामे द्यावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला.
****
विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर
१९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत ६९५
वरुन ७१४ झाली आहे. सप्टेंबर २०१९ पासून ही सलग पाचवी दरवाढ आहे. सार्वजनिक वितरण
सेवेच्या माध्यमातून विकण्यात येणाऱ्या केरोसिनच्या किमतीतही मुंबईत २६ पैशांची वाढ होऊन, ते प्रति लिटर
३५ रुपये ५८ पैसे झालं आहे. विमान इंधनातही दोन पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी वाढ झाली
आहे. आंतरराष्ट्रीय
स्तरावर किमतींमधे वाढ झाल्यानं ही वाढ झाली आहे. काँग्रेस आणि
माकपानं या दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याची टीका विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. सरकारनं जनादेशाचा विश्वासघात केला असून, तीन पक्षांचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं फडणवीस यावेळी
म्हणाले.
****
नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे
येत्या दहा तारखेला राज्यभरात समर्थन फेऱ्या काढण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकता कायदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला क्रांतिकारक
निर्णय असल्याचं सांगत, या
कायद्याला समर्थन देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात आपला पक्ष
समर्थन फेऱ्या काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय नागरिकांसाठी नसून,पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान
या देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असं भारतीय जनता पक्षाचे खासदार सत्यपाल सिंह यांनी सांगितलं
आहे. ते काल औरंगाबादमध्ये पत्रकारांशी
बोलत होते. या कायद्याबाबत काही पक्ष अफवा
पसरवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा इथं, विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसंच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले
या नेत्यांनीही काल शौर्यस्तंभाला अभिवादन केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडला आहे. या पक्षाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी काल कोल्हापूर इथे
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आघाडीच्या
नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, तसंच मातंग समाजातल्या कोणालाही उमेदवारी दिली नाही, या कारणांमुळे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं कांबळे यांनी
सांगितलं.
****
पोलिस स्थापना दिन आज राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आजपासून
आठ जानेवारीपर्यंत पोलिस विभागाच्या कामकाजाबाबत आणि विविध शाखांबाबत नागरिकांना माहिती
देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी दहा वाजता आयुक्त चिरंजीव प्रसाद
यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.
****
उस्मानाबाद इथल्या नियोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
गीताचं काल लोकार्पण करण्यात आलं. उस्मानाबादच्या
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून
गीताचं प्रसारण करून लोकार्पण झालं. साहित्य
संमेलनाची माहिती जनतेपर्यंत पोहचण्यासाठी आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रानं ”जागर साहित्याचा” ही विशेष मालिका कालपासून सुरू केली आहे.
दरम्यान, संमेलनातल्या विविध कार्यक्रमांची
माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहोचवण्यासाठी साहित्य ज्योत काढण्यात येत आहे. तीन आणि चार जानेवारी या दोन दिवसात ही साहित्य ज्योत जिल्ह्यातल्या
आठ तालुक्यातून फिरवण्यात येणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाकडून समाजाच्या वाढलेल्या अपेक्षा विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या सहकार्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असं कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. काल
विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कायद्याच्या चौकटीत आणि विद्यार्थी केंद्रीत कारभार यामुळे समाजात विद्यापीठाचा
नावलौकीक निर्माण झाला असल्याचं कुलगुरू म्हणाले.
****
परभणी शहरातल्या औद्योगिक वसाहतीतली अग्रवाल इंडस्ट्रीज ही कंपनी विनापरवाना व्यवसाय
करत असल्याचं आढळून आल्यानं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल कपंनीवर छापा टाकून
चार लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची ही कंपनी असून, परवाना नसल्यानं प्रशासनानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
****
औरंगाबाद शहरालगतच्या देवगिरी किल्ल्याजवळ काल पहाटे दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
झाला. नववर्षाची पार्टी करून परत येताना
या तरुणांच्या चारचाकी गाडीचं नियंत्रण सुटून गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली, या अपघातात सौरभ नांदापूरकर आणि विर्भास कस्तुरे या दोघांचा
मृत्यू झाला तर अन्य तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं.
****
राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. डॉ.शंकरराव
चव्हाण पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृषाली यादव सारंग यांना, सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार पुणे इथले
महाराष्ट्र टाईम्सचे सचिन वाघमारे यांना, रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कल्याणकर यांना, अनिल कोकीळ सामाजिक पत्रकारिता पुरस्कार साम टिव्हीचे मंगेश
चिवटे यांना, तर औरंगाबाद टाईम्सचे संपादक
शोएब खुसरो यांना मिर्झा अहेमद अली बेग चुखताई ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला
आहे. नांदेड इथं येत्या पाच जानेवारीला
दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
महावितरणच्या लातूर परिमंडळातर्फे उत्कृष्ठ ग्राहक सेवेसह विजेच्या बिलाची थकबाकी
शून्यावर आणणाऱ्या उत्कृष्ट मंडल, विभाग, उपविभाग आणि उत्कृष्ट शाखा कार्यालयास पुरस्कार देण्यात येणार
आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर.कांबळे
यांनी काल लातूर इथं ही घोषणा केली. कार्यालयातले
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नानं महावितरणच्या तुळजापूर आणि अंबाजोगाई
विभागातल्या वाणिज्यक कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातल्या
मुंडे गावाचे लष्करात मराठा लाईफ इन्फन्ट्रीमध्ये सेवेत असलेले जवान संदीप रघुनाथ सावंत, हे काल सकाळी काश्मीरमधे
दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. नौशेरा सेक्टरच्या
राजौरी जिल्ह्यात दहशतवादी शिरल्याची माहिती
सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यावरून जंगलात शोध मोहीम सुरु असताना
ही चकमक झाली. नाईक संदीप
सावंतांसह गोरखा जिल्ह्यातले रायफलमन अर्जुन थापा मगर हेही या चकमकीत शहीद झाले.
****
मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेसच्या वेळेत
केलेला प्रस्तावित बदल रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी सध्याच्या वेळेनुसारच धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
पनवेल ते नांदेड या मार्गावर आठ साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य
रेल्वेनं घेतला आहे. या
महिन्याच्या चार ते सव्वीस तारखांदरम्यान या विशेष गाड्या चालणार असून, नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी साडेपाच
वाजता तर पनवेलहून नांदेडला जाणारी गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता सुटणार आहे.
****
वीज वितरण अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कुठल्याही कामासाठी पैसे मागितले तर शेतकऱ्यांनी
थेट आपल्याशी संपर्क साधावा, असं
आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ते काल लातूर जिल्ह्यात औसा इथं वीज वितरण कंपनीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
No comments:
Post a Comment