▼

Sunday, 19 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा
** अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची साडे पाच हजार पदं तत्काळ भरण्यास मान्यता
** लातूर इथल्या महत्त्वकांक्षी रेल्वे बोगी प्रकल्पाचं ६० टक्के काम पूर्ण
** आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 
आणि
** ३२ व्या राष्ट्रीय रस्सी खेच स्पर्धेचा नांदेड इथं समारोप
****
राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी इथं तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. केंद्रीय राखीव पोलिस दल -सीआरपीएफ पथकाने या स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं.
****
बुद्धिमत्ता आणि चारित्र्य घडवणं, हे शैक्षणिक संस्थांचं खरं उद्दीष्ट आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या एकशे साताव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. समाजाच्या गरजा सातत्यानं बदलत असतात, विद्यापीठांनी त्यानुसार बदल करत आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नागरिकता म्हणजे फक्त अधिकार नव्हे, तर त्यासोबतीनं कर्तव्यही येत असतात, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं.
****
महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेची प्रमुख, या भूमिकेतही अधिक सक्षम असलं पाहिजे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाचा एकोणसत्तरावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुलांनी अभ्यासासह मैदानी खेळ खेळणे, गडकिल्ले पाहणे आवश्यक आहे, असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची पाच हजार पाचशे पदं तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येणार आहे.
याशिवाय, केंद्र शासनानं पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या अट्ठ्याण्णव अंगणवाड्या आणि सातशे पंचेचाळीस मिनी अंगणवाडी केंद्रं सुरु करण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं.
****
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यावर भर देणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी संस्कृती जतन व्हावी, हा या मागचा उद्देश असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. राज्यात औसा, राजगड, नवदुर्ग, तसंच परांडा या किल्ल्यांची डागडुजी करताना किल्ले मूळ स्वरुपात जतन करण्यात आले, याच पध्दतीने राज्यात इतर गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संरक्षण करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले.
****
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादामुळे शिर्डीत बंद पाळण्यात येत आहे. शिर्डी परिसरातली २५ गावंही या बंदमध्ये सहभागी झाली आहेत. मात्र, साईबाबा देवस्थानकडून  मंदिरातील आरती, दर्शन, प्रसाद आदी व्यवस्था नियमित राहणार असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी साईबाबा जन्मस्थान विकासासाठी पाथरीकरता शंभर कोटी रुपये निधी जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.
****
लातूर इथल्या महत्त्वकांक्षी रेल्वे बोगी प्रकल्पाचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र-कर्नाटक-मध्य प्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली. या प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण होऊन उत्पादनास सुरुवात होण्याच्या दृष्टीनं सर्व कामं केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून चारशे एकर परिसरांत उभारला जाणाऱ्या या प्रकल्पातून दरवर्षी अडीचशे बोगी निर्मितीचं उद्दीष्ट आहे.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज १९ जानेवारीला संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना लस देऊन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना पत्र पाठवणाऱ्या संशयीत इसमाला काल नांदेड शहरातल्या इतवारा भागातून काल अटक करण्यात आली. भोपाळ इथल्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. डॉ सय्यद अब्दुल रहेमान मोहम्मद असं या संशयिताचं नाव आहे. नांदेड पोलीस ठाण्यात नोंद करून त्याला भोपाळ इथं चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना दोन दिवसांपूर्वी हे पाकीट मिळालं होत. या पाकिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल, आणि खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या छायाचित्रांवर फुली मारलेली होती, तसंच इंडीयन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संबंधाने उर्दू भाषेतून हे पत्र लिहिल्याचं आढळून आलं आहे.
****
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतल्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मुख्य परीक्षेत लातूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. लातूर इथल्या सुमारे दोनशे एकावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी १५५ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पर्सेंटाईलनं उत्तीर्ण झाले आहेत.
*****
औरंगाबाद इथं आज मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं, शहरातल्या जीवन विकास ग्रंथालयात आयोजित या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन, कथाकथन, बालसाहित्यिकांचा सन्मान, असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या होट्टल महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात देगलूर इथले बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांची बासरी आणि उद्धवबापू आपेगावकर यांच्या मृदंगवादनाची जुगलबंदी रंगली. विद्यार्थ्यांनी यावेळी बासरी वादन सादर केलं.
****
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन मोहीम सुरू करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक व्हावेत, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ राजीव मोहगावकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते त्रेपन्न वर्षांचे होते. कर्करोगानं आजारी असलेले डॉ मोहगावकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
उस्मानाबाद इथल्या तेरणा सहकारी बँकेचे माजी संचालक विठ्ठल कुलकर्णी यांचं काल उस्मानाबाद इथं निधन झालं, ते अट्ठ्याऐेंशी वर्षांचे होते. उस्मानाबाद नगरपालिकेचे नगरसेवक, धारासूर मर्दिनी पतसंस्थेचे संचालक, नगर वाचनालयाचे संचालक, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात लवकरच देशव्यापी आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी दिला आहे ते काल हिंगोली इथं, बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत हे बोलत होते. व्याख्यानमालेचं हे ३३ वं वर्ष आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायद्या विरूध्द मुस्लिम समाजाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा काल सातवा दिवस होता.
****
केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत सायकलथॉन घेण्यात आली. प्रत्येक नागरिक निरोगी रहावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे साडे तीनशे युवक सहभागी झाले.
****
नांदेड इथं ३२ व्या राष्ट्रीय रस्सी खेच स्पर्धेचा काल समारोप झाला. ३४० किलो वजनी गटात मुलींमध्ये केरळनं, तर मुलांमध्ये गुजरातनं प्रथम क्रमांक पटकावला. ६४० किलो वजनी गटात मुलींमध्ये केरळ प्रथम, तर मुलांमध्ये चंदीगढ संघ प्रथम क्रमांकावर राहीला. तर ५६० किलो मिश्र गटात पंजाब राज्यानं प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं.
****
टेनिसपटू सानिया मिर्झानं मोठ्या विश्रांतीनंतर यशस्वी पुनरागमन करताना होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं महिला दुहेरीचं अजिंक्यपद जिंकलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत दोन वर्षांच्या खंडानंतर टेनिस कोर्टवर उतरलेल्या सानियानं युक्रेनच्या जोडीदारासोबत खेळताना चिनी प्रतिस्पर्धी जोडीला सहा -चार, सहा-चार असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं.
दरम्यान, रोम रँकिंग सेरीज कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगाटनं त्रेपन्न किलो वजनगटात सुवर्ण पदक जिंकलं आहे. तिनं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल इक्वाडोरच्या लुईसा वेलवर्ड हिचा चार शून्य असा पराभव केला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज बंगळुरू इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****

No comments:

Post a Comment