Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03
January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस
** महिलांविरूद्धचे गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘सायबर
सेफ वुमन’ मोहीम सुरू
** हिंगोली, नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परीषद महाविकास आघाडी तर सांगली भारतीय
जनता पक्षाच्या ताब्यात.
आणि
** इंदू मिलमधलं भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षांत उभारण्याचं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं
आश्वासन
****
राज्याच्या अनेक भागात काल गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी
जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.
हिंगोली जिलह्यात आखाडा बाळापूर, वसमत, हयातनगर, वारंगा फाटा आणि नांदापूर परिसरात, नांदेड जिल्ह्यात माहूर, वाई, नांदेड या भागात हा अवकाळी पाऊस पडला. माहूर तालुक्यात काल पहाटे गारांचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
तालुक्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. उस्मानाबाद
जिल्ह्यातही काल पहाटे काही भागात गारपीट झाली. औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे.
विदर्भातही नागपूर, वाशिम, अमरावती जिल्ह्यात काल पहाटे गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या
कडकडाटासह पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
झाला. या अवकाळी पावसामुळे तूर आणि
कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू, हरभरा
या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बोर, पेरू, डाळींब, आंबा
या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
****
राज्यात महिला आणि बालकांबाबतच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन
प्रयत्नशील असून,
महिला आणि बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून
महिलांवरचे गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर
सेफ वुमन’ मोहीम राज्यभरात सुरू
करण्यात आली असून,
याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला हा संदेश दिला. सायबर
गुन्ह्यांचं वाढणारं प्रमाण चिंताजनक असून, त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचं वारंवार बदलणारं स्वरूप जास्त गंभीर असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
दरम्यान, ‘सायबर सेफ वुमन’ मोहीमेअंतर्गत आज राज्यभरात जनजागृती मोहिम राबवली जाणार
आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी व्याख्यानं, कार्यशाळा आदी कार्यक्रम
घेण्यात येणार आहेत.
****
शीख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी यांची जयंती काल सर्वत्र उत्साहानं
साजरी झाली. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह
ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये या निमित्तानं झालेल्या शबद कीर्तन, गुरुग्रंथ पठण, लंगर वाटप आदी कार्यक्रमांत शीख बांधव भक्तीभावानं सहभागी झाले. यानिमित्त नांदेड इथं राष्ट्रीय स्तरावर गोल्डन हॉकी स्पर्धा
घेण्यात आली. औरंगाबाद इथं यानिमित्त धावणी
मोहल्ला इथल्या गुरुद्वार्यातून नगर किर्तन काढण्यात आलं. यात शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
बिहारमध्ये पाटणासाहेब या गुरु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये
जगभरातून आलेले हजारो शीख बांधव सहभागी झाले.
****
हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे. काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले यांची अध्यक्षपदी
बिनविरोध निवड झाली. तर
उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनिष आखरे यांची निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी
निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश
पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्राजक्ता कोरे, तर उपाध्यक्षपदी शिवाजी डोंगरे विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना, रयत विकास आघाडी आणि घोरपडे गटानं भाजपला साथ दिली.
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नांदेडचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या
अध्यक्ष - उपाध्यक्ष पदांची आज निवडणूक होत आहे.
****
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या घेण्याचे मात्र
निकाल १३ जानेवारीपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही के जाधव यांनी दिले आहेत. सभेला उपस्थित न राहिलेल्या
सहा सदस्यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात या सदस्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली
आहे, त्यावर काल हा निर्णय दिला. पाच अपात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार बहाल न करण्याचा निर्णय
न्यायालयानं कायम ठेवला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईत इंदू मिलमधलं नियोजित
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षांत उभारलं
जाईल, असं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. काल सकाळी स्मारक परिसराची पाहणी केल्यानंतर ते
वार्ताहरांशी बोलत होते. १४
एप्रिल २०२२पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंड्याचे आमदार डॉ तानाजी सावंत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं उस्मानाबाद इथं शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची काल खासदार ओमराजे निंबाऴकर
यांच्या कार्यालयात बैठक झाली. सावंत
यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करणार असल्याचं
पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यावेळी
जिल्हाप्रमुख गौतम लटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणला सुरुवात झाली असून, बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेतलं कर्जखातं आणि
बचतखातं आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर नगरपरिषदेनं तुळजाभवानी मंदिर परिसरात प्लास्टिक
वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. प्लास्टिाक वापरणाऱ्या भक्तांची
देखील चौकशी केली जात असून, दंड
वसूल करण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचे हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचं पोर्टलवरचं
नाव हे आधार कार्डप्रमाणे असल्याची खात्री करावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातल्या चार लाख १९ हजार ३३२ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्याचं काम पूर्ण झालं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या लाडझरी इथले भारतीय सैन्यदलातले जवान महेश तिडके यांच्या पार्थिव
देहावर काल लाडझरी इथं शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबमधल्या भटिंडा इथं कार्यरत असताना, दाट धुक्यामुळे दुचाकीला अपघात झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला
होता.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथं शासकीय कामात अडथळा
आणल्याप्रकरणी पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बसस्थानक परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात
आली.
****
भारतीय कापूस महामंडळ -सीसीआयच्या
माध्यमातून जालना आणि बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आतापर्यंत एकूण ८६ हजार
७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयनं कापसाला प्रतिक्विंटल साडेपाच
हजार ते पाच हजार ३०० रुपयांपर्यंत दिला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही कापूस खरेदी मार्चपर्यंत सुरू राहणार असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस खरेदीत वाढ झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या
अंतर्गत अठरा कैद्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी पदवी प्रवेश परीक्षा दिली. कारागृहाच्या शिक्षण विभागात अनेक कैदी, टिळक मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कैद्यांच्या भावी जीवनासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षणाचा
लाभ होत असल्याचं कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डी पी त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्रिपाठी यांच्या निधनामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला उत्तम संसदपटू आपण गमावला, अशी भावना कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार
सुप्रिया सुऴे यांनीही दुख: व्यक्त केलं. त्रिपाठी
यांचं काल सकाळी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते सदूसष्ठ वर्षांचे होते.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यापूर्वी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुजय विखे, आमदार
सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह
अनेकांनी वाघ यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. कृतिशील जीवन जगलेले वाघ यांच्या स्मृती चिरंतन राहतील, या शब्दात पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
No comments:
Post a Comment