Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १९
जानेवारी
२०२० दुपारी ०१.०० वाजता
****
मुंबईच्या प्रसिद्ध १७ व्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'ला आज सकाळी उत्साहात
सुरुवात झाली. मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेचं उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या
हस्ते, तर ड्रीम रनचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात
आलं. या मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांसह देश-विदेशातील धावपटू सहभागी झाले होते.
एलिट रन प्रकारात इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंमध्ये चुरस बघायला
मिळाली. यात इथिओपियाचा डेरारा हरीसा विजयी ठरला आहे.
दरम्यान, या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या गणेश माळजळकर या ६४ वर्षीय
धावपटूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू ओढवला आहे. चार किलोमिटर अंतर धावल्यावर
ते खाली कोसळले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता, डॉक्टरांनी तपासून, त्यांना
मृत घोषित केलं.
****
कोलकाता इथं आज नववा आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव सुरू होत
आहे. एजाज खान दिग्दर्शित हमीद हा चित्रपट प्रथम प्रदर्शित होईल. आठवडाभर चालणाऱ्या
या महोत्सवात ४५ देशांतील सुमारे २५० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार
विजेता बाल कलाकार तलहा अर्सद ऋषी या महोत्सवाचं उद्घाटन करणार असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या
पार्श्वभूमीवर बेमुदत शिर्डी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव
तालुक्यात असलेल्या शिर्डी इथं काल रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला
आहे. त्यानुसार आज गावतली बाजारपेठ, सर्व दुकानं आणि व्यवहार बंद राहणार आहेत. साईबाबांचं
मंदिर मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यासह देशभरात आज सकाळपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला
सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात महापौर नंदकुमार घोडेले यांनी रेल्वे स्थानकावरील
केंद्रावर बाळाला लस पाजून या मोहिमेची सुरवात केली. याशिवाय मराठवाड्यातही सर्वत्र
लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
विशेष मिशन इंद्रधनुषअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेच्या
दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २४८ सत्रं आणि मोबाईल टीमद्वारे ९३४ बालकांना डोस दिला
जाणार आहे, तर १२८ गरोदर मातांचं लसीकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी यांनी सांगितलं आहे.
****
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या
वतीनं आयोजित, बालसाहित्यिकांच्या मेळाव्याला आज सकाळी उत्साहात सुरवात झाली. शहरातल्या
जीवन विकास ग्रंथालयात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी या मेळाव्याचं उद्घाटन
केलं. यावेळी ज्येष्ठ लेखक बाबा भांड, कवी दासू वैद्य, प्रशांत गौतम उपस्थित होते.
या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन, कथाकथन, बालमेळावा, बालसाहित्याचं प्रदर्शन
आणि मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा सन्मान, असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात असलेल्या हरिश्चंद्र गडावरील
प्रसिद्ध कोकण कड्यावरून रॅपलिंग करत असताना प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत हे बेपत्ता
झाल्याचं वृत्त आहे. गिर्यारोहकांचा एक चमू स्थानिकांच्या मदतीनं सावंत यांचा शोध घेत
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला अखेरचा सामना आज बंगळुरू इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात
होईल. मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
एकवीस वर्षाखालील खेळाडूंसाठी दोन दिवसीय तलवारबाजी स्पर्धा आज
भोपाळमध्ये सुरू होत आहे. एक भारत श्रेष्ठ भारत अभियानात या स्पर्धेचं आयोजन केलं जात
आहे. फेन्सिंग तलवारबाजी ही मध्य आशियाई मार्शल आर्टची शैली आहे. या स्पर्धेत उत्तराखंड,
कर्नाटक, गोवा, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, बिहार आणि त्रिपुरा या आठ राज्यांतील
संघ सहभागी आहेत.
****
No comments:
Post a Comment