Thursday, 2 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02.01.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जानेवारी २०२० दुपारी १.०० वा.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथलं नियोजित स्मारक दोन वर्षांत पूर्ण उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज इंदू मिल परिसराची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पुढच्या दोन वर्षांत १४ एप्रिल २०२२ पर्यंत स्मारक उभारण्याचं काम पूर्ण केलं जाईल, स्मारक उभारणीला काहीही अडचण येणार नाही, असं पवार यांनी सांगितलं. 

****

राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत भूमिपूजन झालं. पोलीस महासंचालक गृहनिर्माण बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुलासह सुविधायुक्त ४४८ सदनिकांचं बांधकाम करण्यात येणार आहे. सात मजल्यांच्या सोळा इमारती या परिसरात उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर इथं, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा परिसर राष्ट्राला अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्यासाठीची पंधरा अग्निसेवा पदकंही प्रदान केली जाणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अकादमीची पायाभरणीही शाह यांच्या हस्ते आज होणार आहे.

****

मराठवाड्यात आज अनेक भागात पाऊस झाला. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा नांदापूर परिसरातही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली तर नांदेड जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या वाई, हिमायतनगर या परिसरात गारांसह पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

विदर्भातही वाशिम, अमरावती जिल्ह्यात पहाटे पासून गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून आज पहाटेपासूनही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बोर, पेरू, डाळींब, आंबा या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

****

शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांची जयंती आज सर्वत्र उत्साहाने साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये या निमित्तानं शबद, कीर्तन, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

बिहारमध्ये पाटणासाहेब या गुरु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानी यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमांमध्ये जगभरातून आलेले हजारो शीख बांधव सहभागी होत आहेत. गुरु गोविंदसिंह यांचा १६६६ साली या ठिकाणी जन्म झाला होता.

****

दृष्टीहीनांना चलनी नोटांचं मूल्य ओळखता यावं यासाठी रिझर्व बँकेनं मनी अर्थात, मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर हे अॅप सुरू केलं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग प्रणालींवर हे अॅप उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्यावर ते ऑफलाईन देखील चालू शकेल. या अॅपद्वारे हिंदी आणि इंग्रजीतून नोटांचं मूल्य किती आहे ते ऐकता येणार आहे.

****

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एनईईटी २०२० साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत सहा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे संकेतस्थळावर काही समस्या निर्माण झाल्याच्या कारणावरून ही मुदतवाढ देण्यात आली. मात्र अर्जात ऑनलाईन दुरुस्ती करण्यासंबंधीची मुदत पूर्वीप्रमाणेच १५ ते ३१ जानेवारी असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी दरात जास्त वाहिन्या पाहू शकणार आहेत. आता ग्राहकाला सर्व विनाशुल्क वाहिन्या केवळ १६० रुपयात पाहता येणार आहेत.

****

येत्या रविवार पासून सुरू होत असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या रविवार गुवाहाटी इथं होणार आहे. त्यानंतरचे दोन सामने अनुक्रमे पुढच्या मंगळवारी आणि शुक्रवारी, इंदूर आणि पुण्यात होणार आहेत.

****


No comments:

Post a Comment