Friday, 31 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 31.01.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद थोड्याच वेळात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करतील. २०२०- २१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत उद्या सादर केला जाईल. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा दोन मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, या अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज संसद भवन परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं केली. या कायद्याला विरोध करणाऱ्या घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन अनेक खासदार या निदर्शनात सहभागी झाले.
****
निवृत्तीवेतनधारकांचा हयातीचा दाखला यापुढे बँकांनी संबंधितांच्या घरून संकलित करण्याचे निर्देश केंद्र सरकाने दिले आहेत. निवृत्तीवेतनधारकांचा बँकेपर्यंत येण्याचा त्रास वाचावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी साठ रुपशे शुल्क आकारलं जाणार आहे. निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी संबंधितांना दरवर्षी हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात सात मतदान केंद्रावर यासाठी मतदान घेतले जात असून, ४८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे.
****
परभणी इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क साहेब यांचा ऊर्स आजपासून सुरू होत आहे. मनोरंजनाच्या विविध साहित्यांसह मीना बाजार, विविध मिठाईची दुकानं या परिसरात उभारण्यात आली आहेत. या ऊसला राज्याच्या अनेक जिल्ह्यांसह परराज्यातून ही मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
****
भारत आणि न्यूझीलॅँड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं तीन-शून्य अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****


No comments:

Post a Comment