▼

Saturday, 18 January 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.01.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
बुद्धिमत्ता आणि चारित्र्य घडवणं, हे शैक्षणिक संस्थांचं खरं उद्दीष्ट आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या एकशे साताव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. अनेक शैक्षणिक संस्था अध्यापनाकडे व्यवसाय म्हणून पाहतात, हे खेदजनक असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले.
****
महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेची प्रमुख, या भूमिकेतही अधिक सक्षम असलं पाहिजे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाचा एकोणसत्तरावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त करताना, मुलांनी अभ्यासासह मैदानी खेळ खेळणे, गडकिल्ले पाहणे आवश्यक आहे, असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची पाच हजार पाचशे पदं तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम गतीनं राबवता येईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.
याशिवाय, केंद्र शासनानं पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या अट्ठ्याण्णव अंगणवाड्या आणि सातशे पंचेचाळीस मिनी अंगणवाडी केंद्रं सुरु करण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं.
****
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंडेखोरी या गावात आज पट्टेदार वाघ दिसून आल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशत पसरल्याचं वृत्त आहे. शेतात लपलेल्या या वाघाची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिल्यानंतर विभागाचं पथक या गावात दाखल झालं. फटाक्यांचे आवाज करून या पथकानं वाघाला जंगलाकडे जायला भाग पाडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेला अकोल्यात आजपासून सुरुवात झाली. मानव संसाधन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोला यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित ही दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’हा या परिषदेचा विषय असून, यात जलसंवर्धन आणि जलसिंचन या संदर्भात तज्ज्ञांची व्याख्यानं होणार आहेत.
****
औरंगाबादमध्ये उद्या मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं, शहरातल्या जीवन विकास ग्रंथालयात आयोजित या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन, कथाकथन, बालमेळावा, बालसाहित्याचं प्रदर्शन आणि मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा सन्मान, असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन मोहीम सुरू करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक व्हावेत, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, परभणीमध्ये जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्याला आज प्रभात फेरीनं सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ राजीव मोहगावकर यांचं आज निधन झालं, ते त्रेपन्न वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून कर्करोगानं आजारी असलेले डॉ मोहगावकर यांच्यावर औरंगाबाद इथल्या सेठ नंदलाल धूत रुग्णालयात उपचार सुरू होते, आज दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर रामनगरजवळ आज सकाळी एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. रस्त्यावरच्या दिव्याच्या तुटलेल्या केबलमध्ये दुचाकीचं हँडल अडकून तोल गेल्यानं हा अपघात झाला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या संदर्भात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
पाथ्रीहून सेलूकडे नेण्यात येणारा सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचा गुटखा ट्रकसह जप्त करण्यात आला आहे. आज पहाटे पाथ्री पोलिसांनी ही कारवाई केली.
****

No comments:

Post a Comment