Saturday, 25 January 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.01.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उद्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील.
ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
उद्या साजऱ्या होणाऱ्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रात्री सात वाजता राष्ट्राला उद्देशून संबोधित करतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून याचं प्रसारण केलं जाणार आहे. रात्री साडेनऊ वाजता प्रादेशिक भाषांमधून याचा अनुवाद प्रसारित केला जाणार आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २०१९ साठीच्या ‘जीवन रक्षा पदकां’ना मंजुरी दिली आहे. एकूण ५४ जणांना हे पदक दिले जाणार आहेत. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक एकूण सात जणांना दिले जाणार आहे. यात महाराष्ट्रातल्या महेश साबळे यांचा समावेश आहे. आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक दिले जाणार आहेत. तर ३९ जणांना जीवन रक्षा पदक दिले जाणार आहेत. यात राज्यातल्या एम. कार्तिकेयन, कुमारी प्रमोद देवदे, मास्टर शिवराज भंडारवाड आणि दत्तात्रेय तेंगले यांचा समावेश आहे.
****
केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दलातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातल्या चार जणांना शौर्यासाठीचे राष्ट्रपती पोलीस पदक, २८६ जणांना शौर्यासाठीचे पोलीस पदक, ९३ जणांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६५७ जणांना प्रशंसनीय सेवेसाठीचे पोलीस पदक प्रदान करण्यात आली. यात राज्यातील दहा जणांना शौर्यासाठीचे पोलीस पदक, चार जणांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर ४० जणांना प्रशंसनीय कामगिरीसाठीच्या पोलीस पदकांसाठी निवड करण्यात आली आहे.
****
पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगानं आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. पदवीधर मतदारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थाना सुकाणू समिती म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केलं.
****
परभणी जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या २१९ कोटी दोन लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचं मलिक यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातला शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असून या विभागांना प्राधान्यानं निधी दिला जाईल. आरोग्य विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांसोबत मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असंही पालकमंत्री मलिक म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती असल्यानं जिल्ह्यातल्या रखडलेल्या विकासकामांना पूर्ण करण्यासाठी या कामांना गती देणार असल्याचं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पालकमंत्री गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात समाविष्ट असलेल्या नऊ गावांच्या ग्रामस्थांनी आम्हाला नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करावं या मागणीसाठी नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग तासभर अडवल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा, हिवरा, वरुड, झुनझुनवाडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळी, जवळा, वडगाव या नऊ गावचे ग्रामस्थ या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना आंदोलकांनी मागणीचं निवेदन दिलं.
//**********//

No comments:

Post a Comment