Saturday, 4 January 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.01.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 January 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या मीना शेळके आणि उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड विजयी झाले आहेत. अध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसच्या मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी तीस मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी भानुदास पालवे यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला. इयत्ता तिसरी वर्गाचा विद्यार्थी समर्थ मिटकर याच्या हातातील चिठ्ठीत मीना शेळके यांचं नाव आल्यानं हे एक मत ग्राह्य धरून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे किशोर बलांडे यांनी माघार घेतल्यानं भाजपचे लहानू गायकवाड आणि शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यात थेट लढत झाली. भाजपचे लहानू गायकवाड ३२ मतं घेवून विजयी झाले. तर शिवसेनेच्या शुभांगी काजे यांना २८ मतं पडली.
दरम्यान, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणुकही आज पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या सिरसाट यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या वतीनं योगिनी थोरात यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी भारत काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीचा निकाल १३ जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे.

****

मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जालन्यात समर्थकांसह बैठक घेतली. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव करत तीन वेळेस निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाकडून आपणाला संधी मिळेल, अशी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पक्षाकडून तसं आश्वासनही आपणाला देण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी आपणाला डावलण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं. यापुढे कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आपणाला मान्य असेल असं गोरंट्याल म्हणाले. दरम्यान, जालन्याच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पक्षश्रेष्ठींची भेट घेवून सामुहिक राजीनामे देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

****

महाविकास आघाडीतल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप परवा सोमवारी होण्याची शक्यता असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार काही नवीन विभाग सुरु करण्यासंदर्भात विचार करत असल्याचंही मलिक म्हणाले. खातेवाटपावरुन आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या कथित वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी ही माहिती दिली.

****

कंपनी सचिवांनी औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत सहभागी होण्याचं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा मुंबई इथं सुरु असलेल्या कंपनी सचिवांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतून चांगले विचार मंथन होऊन भावी पिढीला दिशा देणारे मार्गदर्शक या माध्यमातून घडावे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

****

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या कोथळी गावाजवळ आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाल्यानं २३ विद्यार्थी जखमी झाले. धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस रस्त्याखाली उतरून थेट शेतीच्या बांधाला जाऊन धडकली. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. बुलडाणा - खामगाव मार्गावर रोहना गावानजीक अन्य एका अपघातात महामंडळाच्या धावत्या बसचं टायर फुटल्यानं अपघात घडला. यामध्ये एक दिव्यांग शिक्षक बसच्या धडकेनं जागीच ठार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उद्या संध्याकाळी सहा वाजता ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा डॉ. ना गो नांदापूरकर सभागृहात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. पाटील यांच्या ’कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला २०१९ चा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment