Wednesday, 12 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.02.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ररोज पंचेचाळीस मिनिटांचं वाढीव काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावं लागणार आहे. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनीयम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे आणि ज्यांच्या सेवा अत्यावश्यक समजल्या जातात, अशा कार्यालयांना मात्र पाच दिवसांचा आठवडा लागू नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीतला हा निर्णय येत्या एकोणतीस तारखेपासून लागू होणार आहे.
****

 राज्य शासनाच्या, इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग, विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास वर्गीयांसाठीच्या विभागाला ”बहुजन कल्याण विभाग” या नावानं ओळखलं जावं, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
****

 ाज्यातल्या बालसंस्थांमधल्या मुलांचं  कल्याण आणि पुनर्वसन करण्यासाठी राज्य बाल निधी निर्माण करायला आणि त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करायला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****

 जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कायद्याचा प्रभावीपणे प्रचार  करण्याचे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या कायद्यासंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या प्रचारासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्य सरकारनं सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा सतरा दिवसात दोन लाखांहून जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेचा दर्जा उत्तम राहावा याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****

 `किटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२०` ला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत, हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात सदनासमोर मांडलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या विधेयकामुळे देशात सेंद्रीय कीटकनाशकांचा वापर वाढेल, असं जावडेकर यांनी सांगितलं.
****

 `आयुष्मान भारत` योजनेत समाविष्ट नसलेल्या प्राणघातक आणि खर्चिक  आजारांच्या उपचारांसाठी, या योजनेच्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य निधीतून पंधरा लाख रुपयांपर्यंत सहाय्य मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं यासंदर्भात केलेली सूचना स्वीकारत आरोग्य मंत्रालयानं धोरणात हा बदल केला असून, यामुळे कोणत्याही गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना उपचार घेणं शक्य होणार आहे.
****

 कुख्यात अतिरेकी  आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याला पाकिस्तानातल्या न्यायालयानं दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी साडेपाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत पुरवल्याबद्दल त्याला ही शिक्षा सुनावण्यात आल्याचं पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद टपाल विभागा अंतर्गत जिल्ह्यातल्या दोनशे ब्याण्णव ठिकाणी `पोस्ट पेमेंट बँकेची` पंच्च्याऐंशी हजार खाती उघडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी दिली आहे. ग्रामीण भागात या बँकेला चांगला प्रतिसाद मिळत असून २९२ पैकी २४५ शाखा ग्रामीण भागात आहेत. या सर्व ठिकाणी येत्या अठरा तारखेला `पोस्ट पेमेंट बँक खाते` उघडण्यासंदर्भात महामेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा इथून बावीस बांगलादेशी नागरीकांना अटक करण्यात आलं आहे. यात दहा महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी पथकानं काल रात्री ही कारवाई केली.
****

 परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांन वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम केल्यानंतर दिलं जाणारं बारा हजार रुपयांचं प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावं यासाठी ते थेट ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेनं केलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment