Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
राजकीय पक्षांनी आपल्या
उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर
प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात
दाखल झालेल्या एका
अवमान
याचिकेवर न्यायमूर्ती फली नरिमन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज हा आदेश दिला.
गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांमधे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात झालेली वाढ चिंताजनक
आहे, असं न्यायमूर्तींनी यावेळी म्हटलं. फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराच्या
निवडीची कारणंही राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत, असे निर्देश
न्यायालयानं दिले आहेत.
****
केरळमधे दुसऱ्या कोरोना
विषाणुबाधित रुग्णावरच्या उपचारांना यश आलं आहे. हा रुग्ण बरा झाला असल्याची पुष्टी
पुण्याच्या विषाणू विज्ञान संस्थेनं केली आहे. केरळमधे सध्या तीन हजार ४४७ लोक वैद्यकीय
निगराणीखाली आहेत. ३८० संशयितांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी
३४४ जणांना विषाणुची बाधा झाली नसल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे.
****
शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयांची
संख्या वाढवण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारणेकडे लक्ष द्यावं आणि उपलब्ध असलेल्या
संसाधनांचा वापर करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करावेत, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण
मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत. विधानभवनात आज नवीन महाविद्यालय स्थापन करण्याकरिता
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन बृहत आराखडा तयार करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात
आली होती, त्यावेळी सामंत बोलत होते. विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून
देता येईल का याकडे अधिक लक्ष द्यावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
उच्च रक्तदाबाच्या
रुग्णांवरील उपचार आणि पाठपुरावा
करण्यासाठी सध्या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात
येणारे ‘सिम्पल’ ॲप आता दुसऱ्या टप्प्यामध्ये
गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे,
पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यात वापरण्यात
येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची नोंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातला
पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात नुकताच सुरु झाला असल्याची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत दिली.
****
देशाची अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यात सरकारला अपयश
येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज
सांगली इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. लोकांच्या इच्छेचा सन्मान करून एकत्र येऊन
लोकांचे प्रश्र्न सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशातील
लोक भाजपला नाकारत असून भाजपमध्येही नेतृत्वाची दहशत असल्याचं पवार यांनी यावेळी म्हटलं.
****
महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांवेळी पोलिसांना
तासंतास उभं राहावं लागतं, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी खुर्च्या देणं बंधनकारक करावं,
अशी मागणी शरद पवार यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे. मिरज इथं
एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी
ही माहिती दिली असून या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पवार यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील
आटपाडी खानापूरचे माजी आमदार सदाशीव पाटील यांनी आज काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी
काँग्रेसमधे प्रवेश केला. विटा नगरपालिकेचे अध्यक्ष आणि बावीस नगरसेवकांनीही यावेळी
काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
****
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
झाल्या आहेत. शिर्डी इथल्या साईबाबा विश्र्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डी. एम. मुगळीकर यांची नियुक्ती परभणी जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे
घऱगुती गॅसच्या दरवाढी विरोधात क्रांती चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी
यावेळी चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदवला. गॅस दरवाढ रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन
यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला
आघाडीनं धुळे इथंही गॅस दरवाढीविरुद्ध आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शनं करण्यात
आली.
****
नांदेड जिल्हाच्या मुखेड तालुक्यात
होणाऱ्या लेंडी धरणात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं नांदेड
इथं आंदोलन सुरू आहे. सरकारनं तीस वर्षांपूर्वी अकरा गावांची शेतजमीन संपादीत केली होती. या धरणाचं काम अद्याप पुर्ण झालं नसल्यामुळे,
केंद्र सरकारच्या नविन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी
आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे.
*****
***
No comments:
Post a Comment