Sunday, 16 February 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.02.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 16 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाच्या सुरक्षेसाठी ३५ हजारांहून अधिक पोलिसांनी बलिदान दिलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोलिसांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून, दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारक स्थापन केलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं दिल्ली पोलिसांच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या परेडला संबोधित करताना ते बोलत होते. सरकारनं दिल्ली पोलिसांच्या हितासाठी अनेक पावलं उचलल्याचंही त्यांनी बोलतांना नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या गांधीनगर इथं स्थलांतरित वन्य प्रजातींच्या संरक्षणाशी संबंधित १३ व्या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत १३० देशांतील वन्यजीव संरक्ष आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतील. ही परिषद येत्या शनिवारपर्यंत चालणार आहे. यजमान म्हणून पुढील तीन वर्षांसाठी भारताला या परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. १९८३ मध्ये भारताने भटक्या वन्य प्राण्यांच्या संवर्धन व संरक्षणाशी संबंधित करारावर स्वाक्षरी केली होती. तसंच स्थलांतरित समुद्री प्रजातींच्या  संरक्षणासाठी सरकार सातत्यानं आवश्यक पावलं उचलत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकशाहीचे चारही खांब एकमेकांशी स्पर्धा करत बसले, तर लोकहित बाजूला सारले जाईल. जनतेमुळे या चारही खांबांचं अस्तित्व आहे, हे विसरता कामा नये, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज नाशिक इथं जिल्हा न्याय संकुलाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखे न्यायाधीश घडविणारं विद्यापीठ महाराष्ट्रात उभं राहिलं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना दिलं.
****
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे, तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, त्यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, सं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले.
सांगली जिल्ह्यात अंजनी इथं आर. आर. पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. गावात उभ्या राहत असलेल्या पाटील यांच्या स्मृतीस्थळाचं बांधकाम लवकरच पूर्ण केलं जाईल, त्यासाठी आठ कोटी सात लाख रुपयाचा निधीही दिला जाईल, सं ते यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन नवी मुंबईतल्या नेरूळ इथं होत आहे. या परिषदेचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डडा यांच्या हस्ते करण्यात आलं. या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका जुगार अड्ड्यावर काल रात्री छापा टाकला. यामध्ये ३० जणांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून २२ मोबाईल, सहा दुचाकी आणि सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम, असा जवळपास सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पुणे-सातारा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाचं काम अनेक वर्षं रखडलं आहे. त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली नको, तसंच टोल नाका पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हलवावा, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्गही बदलला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झाल्याचं सांगत, हा नाका तातडीनं बंद झाला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्राध्यापक रविंद्र देशमुख यांचं ‘शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व आणि महाराष्ट्रातील गड किल्ले’ या विषयावर, तर मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांचं ‘शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
//*********//


     

No comments:

Post a Comment