Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशाच्या वित्तीय तुटीसंदर्भात
कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 'जन-जन का बजेट २०२०-२१' च्या दुसऱ्या टप्प्यावर हैदराबादमध्ये व्यापार आणि
उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधतांना अर्थमंत्री बोलत होत्या. वित्तीय जबाबदारी आणि
अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा-एफआरबीएम डोळ्यासमोर ठेवून २०२०-२१ चा अर्थसंकल्प तयार
केलेला आहे. प्रथमच अर्थ मंत्रालय
विविध ठिकाणी थेट भेटी देऊन लोकांना बजेट समजावून सांगत असल्याचंही त्या म्हणाल्या.
****
महाराष्ट्राची पुढची निवडणूक रचनात्मक
असेल, ती स्वबळावर
लढू. त्या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी आज केला. भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र
राज्य परिषद अधिवेशन नवी मुंबईतल्या नेरूळ इथं होत आहे. या परिषदेचं उद्घाटन नड्डा
यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका
निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
यावेळी केला. तर शेतकऱ्यांनी राज्यपालांना फसव्या कर्जमाफीबाबत पत्र
लिहावं, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी राज्याच्या सकल
उत्पन्नामधला कृषी क्षेत्राचा २८ टक्क्यांचा वाटा आता घटून १२ टक्क्यांवर आला आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे प्रयोग शेतकऱ्यांच्या
शेतापर्यंत घेऊन जा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यात
दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात
ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह
इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी
कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचा नाशिक दौरा रद्द केला आहे. मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या
मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून. त्यात पवार हे पक्षाच्या कामकाजाचा
आढावा घेणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आपले नाशिकमधले कार्यक्रम रद्द करून मुंबई गाठल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिकमध्ये आज सायंकाळी राज्य वकील परिषदेचा पवार
यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार होता.
****
सेलू येथून परभणीकडे जाणार्या खाजगी बसला झालेल्या
अपघातात एकजण ठार तर पाचजण जखमी झाले आहेत, आज निपाणी टाकळी जवळ ही घटना घडली. बसच्या
स्टेअरींगचा रॉड तुटल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा गेला. बस रस्त्याच्या बाजूला येऊन
झाडास आदळली यात बसचा क्लिनर सय्यद नवाब हा खाली पडून जागीच ठार झाला जखमींना सेलू
येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये सुमारे ५०
प्रवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना शहराचं आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराज
समाधी सोहळ्यानिमित्त जुना जालना भागातून आज पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत
भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामी मंदिरात आयोजित
विविध धार्मिक कार्यक्रमांची आज सांगता झाली.
****
वाशिम जिल्ह्यात रिसोड-मालेगाव मार्गावर दुचाकी आणि
पिकअपची धडक झाली. या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर
पिकअप चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, पुढे जाऊन एका रिक्षाला धडकला. यामध्ये
रिक्षाचंही नुकसान झालं. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
****
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य
बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला उद्यापासून लातुर इथं सुरवात होत आहे. दगडोजी देशमुख
सभागृहात उद्या सकाळी साडे दहा वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या
हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून निवडले गेलेले उत्कृष्ट
नाट्यसंघ त्यासाठी लातुरात दाखल झाले आहेत. ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment