आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
छत्रपती
शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी मुंबईत दादर इथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यात
सर्वत्र शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून ठिकठिकाणी मिरवणुकाही
काढण्यात येत आहेत. औरंगाबाद इथं क्रांतीचौक या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराजांना
अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सांगलीमध्ये मध्यरात्री
बारा वाजता शिवतीर्थावर आतिषबाजीसह शिवजन्मसोहळा साजरा झाला. नांदेड, लातूर, अहमदनगर,
नाशिक इथेही उत्साहानं शिवजयंती साजरी होत असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
छत्रपती
शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातला अभिमानाचा भाग आहे, अशा शब्दात
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली, तर, छत्रपती
शिवाजी महाराज लाखो लोकांचं प्रेरणास्थान आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी
म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले आदर्श राजा होते, अशा शब्दात माहिती आणि
प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अभिवादन केलं.
****
देशात
आज मृदा आरोग्य पत्रिका दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस
फेब्रुवारी २०१५ ला या योजनेचा शुभारंभ केला होता. दर दोन वर्षांनी शेतकऱ्यांना मृदा
आरोग्य पत्रिकेद्वारे मातीच्या गुणवत्तेची माहिती देणं, हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेमुळे गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत असल्याची माहिती कृषी सचिव
संजय अग्रवाल यांनी दिली आहे. सरकारनं या योजनेवर आतापर्यंत सातशे कोटी रुपयांहून अधिक
निधी खर्च केला आहे.
****
राज्यात
शिवभोजन योजनेला मिळणारा भरघोस प्रतिसाद लक्षात घेत या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे
निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार, या योजनेतून आता अठरा
हजार ऐवजी छत्तीस हजार थाळ्या भोजन देण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानं यासंबंधीचा
शासननिर्णय काल निर्गमित केला. यामुळे आता प्रत्येक शिवभोजन केंद्रातून प्रतिदिन कमाल
दोनशे थाळ्या भोजन मिळू शकेल.
****
No comments:
Post a Comment