Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 12 February
2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण; कामकाज दोन मार्चपर्यंत स्थगित
** दिल्ली विधानसभा
निवडणुकीत आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर
** युवापिढीनं
नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहावं - राज्यपालांचं आवाहन
आणि
** तिसऱ्या एकदिवसीय
क्रिकेट सामन्यातही न्यूझीलंडचा भारतावर पाच गडी राखून विजय
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाचा पहिला टप्पा काल पूर्ण झाला. राज्यसभा तसंच लोकसभेचं कामकाज आता येत्या
दोन मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी संसदेच्या दोन्ही सदनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं.
****
दिल्ली विधानसभा
निवडणुकीत आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. विधानसभेच्या सत्तर जागांपैकी
आम आदमी पक्षानं सर्वाधिक ६२ जागा जिंकल्या असून, भारतीय जनता पक्षानं आठ जागा जिंकल्या
आहेत. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, पक्षाच्या ६६ उमेदवारांपैकी ६३
जणांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
****
मुख्यमंत्री
कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली
आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा आणि विभाग स्तरावर लोकांच्या
तक्रारी प्राप्त करून घेण्याकरता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आलं असून
त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
****
विद्यार्थ्यांमध्ये
स्वत:च्या पायावर उभे राहू असा विश्वास निर्माण व्हावा यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य
विकास केंद्रे निर्माण करावीत, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
केल्या आहेत. काल मुंबईत राज्य तंत्रशिक्षण मंडळ- नियामक परिषदेची ३२ वी बैठक सामंत
यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक विभागातल्या अडचणी लक्षात
घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा. असे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, काल
मुंबईत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासंदर्भात सामंत यांनी बैठक
घेतली. या विद्यापीठाच्या परिसरारात शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र आणि संकुलाचे बांधकाम
लवकर पूर्ण करावे. त्यासाठी सर्व मदत करण्यात येईल, असं आश्वासन सामंत यांनी दिलं.
****
महिला आणि बालकांवरचे
लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं तसंच
त्यांच्या पुनर्वसनासाठी राबवल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
यासाठी, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत
आढावा बैठक झाली. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि पीडितांना अर्थसहाय्य
लवकरात लवकर मिळावं, यासाठी तत्काळ कार्यवाही आवश्यक असल्याचं गोऱ्हे म्हणाल्या.
****
राज्यात कौशल्य
विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ४१७ आयटीआय तसंच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण
संचालनालयातल्या क आणि ड वर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार
आहेत. त्यासाठी कौशल्य विकास विभागाने पोर्टल सुरु केले असून या ऑनलाईन प्रणालीमुळे
बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि सुत्रबद्ध पद्धतीने होऊ शकेल, असं कौशल्य विकास मंत्री
नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या बदल्यांसाठी
सुमारे ७०० अर्ज आले असल्याचं मलिक यांनी सांगितलं.
****
केरोसिन वाटपाचे
नियम आणि अटी शिथिल करण्याबाबत प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती नागरी पुरवठा आणि
ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरजूंना
केरोसिनचा पुरवठा करण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. केरोसीन
वाटपाच्या प्रमाणातही वाढ करण्याबाबत तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन
महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटी रुपये निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल
परब यांनी केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जावी आणि
दोन हजार साध्या बस गाड्या खरेदी कराव्यात, त्यांनी म्हटलं आहे. एसटी महामंडळाच्या
संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
युवापिढीनं आपल्या
नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहत उच्च ध्येयासक्ती ठेवून देशाला बलशाली बनवावं, असं
आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत काल
पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या कौशल्यांचा
विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकीक वाढवण्याच्या
ध्येयाने कृतीशील व्हावं, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं. माता, मातृभाषा आणि
मातृभूमी प्रती आदर बाळगणं ही यशाची सुरवात आहे, असं ही राज्यपाल यावेळी म्हणाले. राष्ट्रीय
रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा. अश्विनीकुमार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे
होते.
दरम्यान, विद्यापीठ
परिसरात जलदूत संस्थेनं लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन तसंच लोकार्पण राज्यपालांनी
काल केलं. विद्यापीठातल्या कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचं उद्घाटनही
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
सोलापूर तुळजापूर
रस्त्यावर काल गॅस सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. तामलवाडी नजिक
घडलेल्या या घटनेनंतर चालक वाहकांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्यानं, सुदैवानं जीवीत हानी
झाली नाही. मात्र वाहनातल्या गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाले. दरम्यान, सोलापूरहून दोन
आणि तुळजापूर इथून एक अशा अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येत्या एकवीस
फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयांसह बँकांमध्ये लावण्यात येतील, अशी माहिती जिल्हा
उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एक लाख नव्वद
हजार ६८८ शेतकरी पात्र ठरले असून, कर्जमाफीची रक्कम सुमारे एक हजार २३९ कोटी रुपयांपर्यंत
आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ दोन हजार १५१ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी
जोडणं बाकी असल्याचं जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
ज्या शेतकऱ्यांना
‘पंतप्रधान किसान’ योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र आजपर्यंत कुठल्याही वित्त संस्था
किंवा बँकेकडून किसान क्रेडीट योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नाही. त्यांच्यासाठी पीक
कर्ज पुरवठा मोहीम राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून ‘पीएम किसान’चा लाभ
घेतलेला आहे, अशा शाखांतून किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा,
असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे.
****
संत नरहरी महाराज
यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात
आलं. यानिमित्तानं नांदेड शहरातून सराफा संघटनेतर्फे संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची
मिरवणूक काढण्यात आली.
****
न्यूझीलंडनं
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवीस क्रिकेट सामन्यात पाच गडी आणि सतरा चेंडू राखून विजय
मिळवत मालिका तीन -शून्य अशी जिंकली. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी
सामन्यांची मालिका होणार असून, पहिला कसोटी सामना २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
****
मेलबर्ग इथं
सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला क्रिकेट कसोटी मालिकेतला अंतिम सामना आज भारत आणि
ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होत आहे. सकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. शनिवारी झालेल्या
सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला
होता.
****
हिंगणघाट जळीत
कांडातल्या प्राध्यापक महिलेच्या मृत्यूनंतर काल अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवण्यात
आला. नांदेड इथं विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली. तुळजापूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेच्या वतीनं या प्रकरणी निषेध नोंदवण्यात आला.
****
स्वातंत्र्यसैनिक
सुमंगल प्रभाकरराव खेकाळे यांचं काल जालना जिल्ह्यात परतूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं
निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा
वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या
मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथला पोलीस पाटील लक्ष्मण कोपरटकर याच्या पत्नीला तीन
हजार रुपये लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. कोपरटकर यानं संजय गांधी निराधार
योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती.
जालना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं काल जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ सज्जाचा तलाठी निवृत्ती तावजी
वाघ याच्यासह खाजगी व्यक्ती कृष्णा पाटीलबा वरगणे यांना वीस हजार रुपये लाच घेताना
रंगेहाथ अटक केली. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासह चालकाचा मोबाईल परत देण्यासाठी त्यांनी
ही लाच मागितली होती.
****
मिशन इंद्रधनुष्य
या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात काल आरोग्य विभागाने लसीकरणाच्या
तीन विशेष फेऱ्या घेतल्या. या दरम्यान जिल्हाभरात ० ते २ वर्ष वयोगटातली एक हजार ८८३
बालकं आणि २८१ गर्भवतींचं लसीकरण करण्यात आलं.
****
परभणी ते मुदखेड
रेल्वे पटरी दुहेरीकरणाच्या कामामुळे लिंबगाव - मिरखेल दरम्यान १८ फेब्रुवारी पर्यंत
घेण्यात येत असलेल्या लाईन ब्लॉक मुळे काचीगुडा - नगरसोल - काचीगुडा प्रवासी रेल्वे
गाडीत अंशत: बदल करण्यात आला आहे. ही गाडी आजपासून शुक्रवारी १४ फेब्रुवारीपर्यंत नगरसोल-परभणी-नगरसोल
दरम्यान धावणार आहे.
****
No comments:
Post a Comment