Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 February
2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १८ फेब्रुवारी
२०२० सकाळी ७.१० मि.
****
** लष्करात महिलांना
कायमस्वरूपी कमिशन देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
** एल्गार परिषद प्रकरणाची
विशेष तपास पथकामार्फत समांतर चौकशी करण्याची राष्ट्रवादी
काँग्रेसची भूमिका
* राज्य माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून
सुरूवात
आणि
** राष्ट्रीय नाट्य
शाळेच्या धर्तीवर राज्य नाट्य शाळा सुरू करणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची घोषणा
****
लष्करात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. यामुळे तळप्रमुख म्हणून महिलांची नियुक्ती
होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त शारीरिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे
महिलांना समान संधी नाकारता येणार नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं
आहे. सैन्यादलात महिलांना तुकडीचं नेतृत्व दिलं जावं,
असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं २०१०मध्ये दिले
होते. या आदेशाला केंद्र सरकारनं सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आदेशावर कोणतीही स्थगिती नसताना,
केंद्र सरकारकडून मात्र गेल्या दहा वर्षांत त्यावर अंमलबजावणीबाबत
काहीही प्रयत्न झाले नाहीत, असंही निरीक्षणही न्यायालयानं
नोंदवलं. त्यावर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं येत्या तीन महिन्यात कायम स्वरुपी कमीशन
स्थापन करण्याचे निर्देश दिले.
****
दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार
आणि हत्या प्रकरणातल्या चौघा दोषींना आता येत्या तीन मार्चला फाशी दिली जाईल.
दिल्लीतले अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी काल
या चौघांचं मृत्यू आदेश - डेथ वॉरंट नव्यानं जारी केलं. निर्भयाचे आई -वडील आणि दिल्ली
सरकारनं यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश
दिले. त्यात या चौघांना तिहार कारागृहात येत्या तीन मार्चला सकाळी सहा
वाजता फाशी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही शासनाची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर
तालुक्यातल्या उमरठ इथं नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या
पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनाचं धोरण हे पर्यटन विकासाचे असून, इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथंल्या श्री भराडी देवीचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी दर्शन
घेतलं.
****
एल्गार परिषद प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटी मार्फत समांतर
चौकशी केली जाईल, असं अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची काल पक्षाध्यक्ष शरद पवार
यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर मलिक यांनी
पत्रकारांना माहिती दिली. एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएकडे सोपवला आहे.
एनपीआर अर्थात राष्ट्रीय जनसंख्या नोंदणीच्या प्रश्नावली संदर्भात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी
काँग्रेस हे तिन्ही पक्ष बसून चर्चा करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रश्नांचा समावेश
त्यात करायचा, यावर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.
****
भारतीय जनता पक्ष येत्या पंचवीस
तारखेला राज्यात सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आपल्याला काहीही रस नाही,
असंही पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, येत्या २४ तारखेपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू
होणार आहे.
****
मुंबईत माझगावमधल्या वस्तू आणि विक्री
कर - जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्याला काल
दुपारी भीषण आग लागली. या आगीत दोन मजले जळून खाक झाले. आगीची
माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या आगीची चौकशी
केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे.
औरंगाबाद विभागात ४०६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी औरंगाबाद,
जालना, बीड, परभणी आणि हिंगोली
जिल्ह्यातून एक लाख ७१ हजार ९५९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत काही गैरप्रकार आणि कॉपी होऊ नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आल्याची
माहिती बोर्डाच्या सचिव सुगत्ता पुन्ने यांनी दिली आहे.
दरम्यान, १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पार्सल न स्वीकारता
मंडळ कार्यालयात परत करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता गोठवण्याची कारवाई
करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
परभणी शहरातली पाणी पुरवठा
योजना पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार सुरेश वरपूडकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना
दिली. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून येत्या उन्हाळ्यात नागरिकांना नियमीत पाणी
पुरवठा व्हावा या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत असल्याचंही आमदारांनी सांगितलं.
येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत सर्वांनी अधिकृत नळ जोडण्या करून घ्याव्यात
असं आवाहनही आमदार वरपूडकर यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
मृदा आरोग्य पत्रिका
योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अंबेजवळगा इथले शेतकरी
दादासाहेब कोळेकर यांनी आपल्या शेतजमिनीतल्या मातीचं परीक्षण
करून घेतलं. यामुळे जमिनीतल्या मृदेची गुणवत्ता, क्षार आणि आम्लतेचं प्रमाण त्यांना समजलं. परिणामी पिकाच्या वृद्धी आणि विकासासाठी आवश्यक पोषक तत्त्व जमिनीत उपलब्ध करणं सोपं गेल्याचं कोळेकर
यांनी सांगितलं. ते म्हणाले………
आम्हाला आरोग्य पत्रिकेमध्ये असं सांगण्यात आलं नाही
माहिती पत्रिकेमध्ये असं सांगण्यात आलं नाही माहिती देण्यात आली की तुमच्या जमिनीमध्ये
स्फुरक, फेरस,मॅग्नेशियम आणि बोरॉनची कमतरता आहे असे कळले की ती घटक आम्ही बाजारात
उपलब्ध करून घेतली आणि आमच्या शेतीत पेरणीचे अगोदर शेतात वापरली पेरणी केल्यामुळे प्रत्येक
वेळी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आता आम्हाला फरक जाणवतो. वर्षी एकरी सहा ते सात
क्विंटल मिळत होतं ते आता एवढेच कमीत कमी पंधरा क्विंटल पर्यंत जाते.
****
लातूर इथं काल राज्य प्रदेश शिक्षक काँग्रेसनं भरवलेल्या सातव्या
राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील
चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलतांना चाकूरकर यांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी विज्ञानाधिष्ठीत शिक्षण व्यवस्थेशिवाय पर्याय
नसल्याचं सांगितलं.
****
राष्ट्रीय नाट्य शाळेच्या धर्तीवर राज्यातल्या कलावंतासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य शाळा सुरू सुरू केली जाईल, असं
वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
यांनी म्हटलं आहे. लातूर इथं सांस्कृतिक कला संचालनालयाच्या सतराव्या
राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. या राज्य नाट्य शाळेत कलेशी
संबंधित सर्व प्रकारचं शिक्षण देण्यात येईल,असं ते म्हणाले.
***
औरंगाबादच्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती
शिवाजी महाराज अध्यासन केंद्रात काल शिवजयंती महोत्सवाला सुरूवात झाली. यावेळी
‘शिवरायांचे कार्यकर्तृत्व आणि गडकिल्यांचे व्यवस्थापन’
या विषयावर जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रविंद्र देशमुख यांचं व्याख्यान झालं.
या महोत्सवात आज चंद्रकांत वानखेडे यांचं शेतकऱ्यांचे राजे शिवछत्रपती याविषयावर व्याख्यान होणार आहे.
****
नांदेड इथं
डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त कुसूम महोत्सवा अंतर्गत स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन शिबिरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादितचे
सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल मार्गदर्शन केलं. स्पर्धा परिक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनातून प्रभुत्व मिळवून आत्मविश्वास वाढवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केलं.
****
हिंगोली
नगरपरिषदेनं काल सलग तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांच्या गोदामावर छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचं अकराशे किलो प्लास्टिक जप्त केलं. एका व्यापाऱ्याकडून पाच हजार रूपयांचा दंडही वसूल केला.
****
ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर
यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. चेहऱ्याचा जादुगार अशी ख्याती असलेले जुकर यांनी राजकमल कला मंदीर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म, आदींसोबत काम केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं २०१३ साली
त्यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित
केलं होतं.
****
जालन्याचे प्रसिद्ध भारुडकार प्रभाकरराव देशमुख सेवलीकर यांचं काल जालना इथं वृद्धापकाळानं
निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते.
***
जालना पोलिसांनी काल अवैधरीत्या
गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या संशयित विकास जयराम शिंदे, किशोर घुगे या दोघांना अटक केली आहे.
संशयितांकडून एक पिस्तुल, मॅग्झिन, दोन मोबाईल आणि कार, असा एकूण १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी
काल वार्ताहरांशी बोलतांना दिली.
****
नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीच्या कामाला
वेग आला आहे. मागच्या दोन-तीन दिवसात स्वच्छ
सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहेत. बाजारात
तुरीचे भाव कमी झाले असून शासनाने हमी भावात तूर खरेदीची केंद्र सुरू करावेत अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत.
****
No comments:
Post a Comment