Sunday, 1 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01.03.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०१ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते. पोलिस विभागातल्या ६५० जागांसाठी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीरात प्रसिद्ध झाली असून, यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी नियमाप्रमाणे साडे तीन टक्के म्हणजे २२ जागा अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र फक्त दोन जागा दिल्याचं ते म्हणाले. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोळ असून, या जागा परत देण्याची मागणी पडळकर यांनी केली.
****
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ९४५ गावांमधल्या एक लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांच्या नावांची यादी ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाचं काम केंद्रांसह बँकामध्ये सुरू असून, आजपर्यंत तीन हजार १२२ शेतकऱ्यांचं प्रमाणिकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नॅक विभागामार्फत काल ‘महाविद्यालयांस स्वायत्तता - या विषयावर जागरुकता कार्यशाळा झाली. कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं. स्वायत्ततेमुळे, महाविद्यालयाला, दर्जेदार शिक्षण देता येईल, नवनवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील, आर्थिक बाजू मजबूत होईल, असं ते म्हणाले.
****
बदलत्या जीवनशैलीत वैद्यकीय क्षेत्रातही आमूलाग्र बदल अपेक्षित असल्याचं, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल भारतीय रेडिओलॉजिकल आणि इमेजिंग असोसिएशनच्या, महाराष्ट्र राज्य शाखेनं घेतलेल्या, ४३व्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. 
****
औरंगाबादच्या सातारा पोलिस ठाण्यातला पोलिस उपनिरिक्षक सुभाष भोसले याला चार हजार रूपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली.
****


No comments:

Post a Comment