Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बत्तीस राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात नऊ हजार चारशे जणांना तपासणी तसंच देखरेखीखाली ठेवलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत एकवीस विमानतळांवर एक हजार आठशे अठरा विमानं तसंच एक लाख सत्त्याण्णव हजारांहून अधिक प्रवाशांची या विषाणू संसर्गासंबंधी तपासणी झाली आहे. सर्व राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून `एक भारत श्रेष्ठ भारत` या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहील. भारतातल्या विविध भागांना सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं, हे अभियान सुरू करावं, अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली मांडली होती.
****
बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनीमधले कामगार आणि इतर क्षेत्रातल्या संघटीत आणि असंघटित कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी एका डिजिटल बसचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लोकार्पण केलं. ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. या बसमध्ये डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री, डोळ्यांची तपासणी, फुफ्फुसाची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणाच्या अद्ययावत उपकरणांची सोय उपलब्ध आहे.
****
देशाच्या सुप्रशासनासाठी `ई-गव्हर्नन्स` हा महत्त्वाचा भाग असून तळागाळातील व्यक्तींपर्यंत शासनाच्या सेवा सुविधा तसच योजनांचा लाभ पोहोचवणं ही या प्रकल्पाची खऱी चाचणी ठरेल, असं प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते काल मुंबईत तेवीसाव्या राष्ट्रीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेत बोलत होते. `ई-गव्हर्नन्स` ही देशाच्या भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असून उत्तम प्रशासनासाठी `ई-गव्हर्नन्स` आवश्यक असल्याचंही डॉ. सिंह यावेळी म्हणाले.
****
देशभरात आज राष्ट्रीय जंतनाशक अर्थात `कृमी प्रतिबंध` दिन पाळला जात आहे. लहान तसंच पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पोटात जंत निर्माण झाल्यानं निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचं उच्चाटन करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक ते एकोणीस या वयोगटातल्या मुलांना अल्बेंडाझोल या औषधाचा डोसा पाजला जात आहे. मुलांमधली जंतांची समस्या दूर होत असल्यानं शाळांमधलं गैरहजेरीचं प्रमाण घटल्याचं, तसंच मुलांना व्यवस्थित पोषण होत असल्यानं त्यांच्या आरोग्यात
सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे.
****
काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळी अवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर बांधले जात आहेत.
****
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तिचा वापर व्यापार आणि व्यवसायात झाला पाहिजे असं मत भाषा अभ्यासक-ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानसह रूपवेध ग्रंथालयानं आयोजित केलेल्या ‘भारतीय भाषांची विविधता’या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. कुरुंदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या या व्याख्यानमालेचं हे ३८वं वर्षे असून आज देवी यांचं ‘भाषा, राष्ट्रवाद आणि लोकशाही’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दरम्यान, प्राचार्य कुरुंदकर यांच्या पूण्यतिथीनिमित्त त्यांच्या नांदेड शहरातील पुतळयाला नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, बालाजी कल्याणकर, अमरनाथ राजूरकर तसंच महापौर दिक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यातून खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यां प्रकरणी अटकेत असलेले पाच आरोपी काल संध्याकाळी पळून गेले आहेत. पत्रा उचकटून हे सर्व आरोपी पळून गेले. पोलीसांनी त्यांचा तपास करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
****
जळगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पा प्रकाश पाटील यांचं आज सकाळी हृदय विकारानं निधन झालं. आज संध्याकाळी जळगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या माजी उप नगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी आणि मराठा सेवा संघ जळगावचे अध्यक्ष राम पवार यांच्या बहीण होत.
****
No comments:
Post a Comment