Tuesday, 18 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे. या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती, अधिकारी, लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यासह राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या यादी विरुद्ध काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, असं या पत्रामध्ये नमूद आहे. या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. हे थांबवण्यासाठी आणि लोकशाही संस्थांच्या हितरक्षणासाठी केंद्रानं त्वरित पावलं उचलावीत, संही त्यांनी म्हटलं आहे. 
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ यवतमाळच्या पांढरकवडा शहरात काल भव्य हुंकार फेरी काढण्यात आली. या समथर्थन फेरीत महिला पुरुषांनी विक्रमी सहभाग नोंदवला. सर्व व्यापाऱ्यांनी सीएए कायद्याला समर्थन देत आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून या फेरीत सहकुटुंब सहभाग नोंदवला. फेरीनंतर एका शिष्टमंडळानं तहसीलदारांना निवेदन सादर केलं.
****
सुगंधी तंबाखुवरील बंदी उठवावी या मागणीसाठी पान असोसिएशननं सांगली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल निदर्शनं केली. राज्यसरकारनं सुगंधी तंबाखू विक्रीवर बंदी घातल्यामुळे राज्यातल्या ५ लाख दुकानदारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे, शासनानं ही विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर मोक्का कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी उठवण्याच्या मागणीसाठी गेल्या ८ वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. मोक्काचा निर्णय रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली इथं या व्यावसायिक आंदोलनकर्त्यांनी काल दिला.
****


No comments:

Post a Comment