Tuesday, 11 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE –11.02.2020 TIME - 11.00 AM

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत असून सत्ताधारी आम आदमी पार्टी सत्तरपैकी पन्नास  जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं वीस जागांवर आघाडी घेतली आहे.  सकाळी आठ वाजता एकवीस केंद्रांवर ही मतमोजणी सुरु झाली. या निवडणुकीसाठी शनिवारी सुमारे साडे बासष्ट टक्के मतदान झालं होतं. सहाशे बहात्तर उमेदवारांनी ही निवडणूक लढवली.
****
आज जागतिक युनानी दिवस आहे. श्रेष्ठ युनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंती निमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. युनानी दिवसानिमित्त आयुष मंत्रालयानं नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला आहे.
****
दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं खबऱ्यांचं जाळं आणखी मजबूत करावं, आणि त्यांना बक्षीसही द्यावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत. काल त्यांनी या विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी या सूचना दिल्या आहेत. जप्त केलेल्या मालाच्या किंमतीच्या पाच टक्के रक्कम या खबऱ्यांना द्यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.  
****
राहुटी उपक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध योजनांचा गोरगरीबांना लाभ दिला जात असल्याची माहिती जलसंपदा आणि लाभक्षेत्र तसंच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं नेहरु मैदान आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या राहुटीचा शुभारंभ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना माऊंट मॉन्गनुईमधल्या बे-ओव्हल मैदानावर आज सुरु आहे.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सत्तेचाळीसाव्या षटकात पाच गडीबाद २६९ धावा झाल्या होत्या.
****

No comments:

Post a Comment