Thursday, 13 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 13.02.2020 TIME –13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 13 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद  
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
लोणावळा इथल्या नौसेनेच्या शिवाजी प्रशिक्षण संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गौरव केला. राष्ट्रपतींनी संस्थेच्या समारंभात आज सहभाग घेऊन संस्थेला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करून सन्मानित केलं. राष्ट्रपती ध्वज सैन्यदलांच्या संस्थेला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो. नौदलाच्या एकशे तीस अधिकाऱी आणि सहाशे तीस सैनिकांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ यावेळी आयोजित शिस्तबद्ध संचलनात सहभाग घेतला. आयएनएस शिवाजी संस्थेला या महिन्यात नौदलातील सेवेची पंच्च्याहत्तरर्षे पूर्ण होत आहेत.
****
अंमली पदार्थ प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. देशानं या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नवी दिल्लीत या संदर्भात आयोजित एका दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे थांबावी यासाठी या संदर्भातील नियंमामध्ये बदल केले जाणार असल्याचंही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
****
युरोपीय संघ आणि आखाती देशांच्या पंचवीस राजनैतिक अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज जम्मूला भेट देणार आहे. ते जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांर्ची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामधे जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, न्यूझीलंड, मेक्सिको, इटली, अफगाणिस्तान, ऑस्ट्रिया,उजबेकीस्तान, पोलंड आणि युरोपियन संघाचे राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काल त्यांनी श्रीनगरला भेट देऊन ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-कश्मीरच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
****
समाजात, आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची, सुदृढ शारिरीक आरोग्यासाठीचे सदिच्छादूत म्हणून, केंद्र सरकार  नियुक्ती करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल नि:शंक आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काल नवी दिल्लीत, या सदिच्छादूत उपक्रमाचा शुभारंभ केला. हा उपक्रम सुरुवातीला देशातील २०० जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे.
****
एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था- एनआयएनं करायला आपली हरकत नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे सोपवला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं त्यावेळी या निर्णयावर टीका केली होती. राज्याच्या गृह विभागाला हे प्रकरण एनआयएकडे तपासासाठी सोपवण्यासंदर्भात कोणतीही हरकत नाही, असं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण एनआयएकडे तपास सोपवण्यापुर्वी राज्य सरकारला विश्र्वासात घ्यायला हवं होतं, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात गेल्या आठवड्यात केली होती.
****
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणुन पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष म्हणुन मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी या नियुक्त्यांची माहिती दिली आहे.
****
नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं स्वत:चं महाविद्यालय असावं यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना मिळाली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठ आवारातच महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटंल आहे. याबाबत शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी भुजबळ बोलत होते.
****
आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात लढवणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहितीही आमदार दानवे यांनी दिली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मोठ्या पटसंख्येच्या शंभर शाळांमध्ये दप्तर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली आहे.
****

No comments:

Post a Comment