आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
गेल्या वर्षी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय
राखीव पोलिस दल- सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले होते. देशाच्या संरक्षणासाठी
बलिदान दिलेल्या या जवानांना देश कधीही विसरणार नाही असं
पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या देश कायम ऋणात राहील असं अमित शाह यांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ
सिंह यांनीही श्रद्धांजली वाहिली.
****
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर
आहेत. आज औरंगाबाद इथल्या सुभेदारी विश्रामगृहात ते शाखाध्यक्ष आणि जिल्हाअध्यक्षांसोबत
चर्चा करणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या
अनुशंगानं प्रत्येक वार्डातल्या अडचणी, समस्यांविषयी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार
आहेत. मनसेमध्ये येत असलेल्यांसाठी प्रवेश सोहळाही यावेळी होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या मुरूम इथल्या
विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार, कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष
बसवराज पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सादिकमिया काझी यांची बिनविरोध निवड झाली. या
पदांच्या निवडीसाठी काल बैठक घेण्यात आली.
****
नांदेड तालुक्यातल्या लिंबगाव इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक
शाळेत काल डिजिटल शाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांच्या
हस्ते झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विध्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी
शिक्षक कमी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर जवळ मालवाहू गाडी आणि
रिक्षाच्या अपघातात हिंगोलीतल्या एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यु झाला. हे कुटुंब
हिंगोलीहून कारंजाला एका अंत्य विधीसाठी जात असताना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास
हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment