Monday, 24 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील मैत्री आणखी घट्ट होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारत त्यांची वाट पहात असल्याचंही त्यांनी या संदर्भातील संदेशात म्हटलं आहे. ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज दुपारच्या सुमारास भारतात पोहोचत आहेत. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी, मुलगी, जावई आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानं त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. अधिवेशन सुरू होणाऱ्यापुर्वी महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. येत्या वीस मार्च पर्यंत हे अधिवेशन चालेल. यात सहा मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अधिवेशनात एकूण ६ अध्यादेश आणि १३ विधेयकं मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे.नगर परिषदांच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एका दस्याची निवड करणं, नगराध्यक्षांची निवड पूर्वी प्रमाणे नगरसेवकांमधून करणं, सरपंचांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांमधून करणं आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यावरील शेतकऱ्यांची पूर्वीप्रमाणे अप्रत्यक्ष निवड करणं यासारख्या विधेयकांचा या अधिवेशनात समावेश आहे.
****
राज्य सरकार ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजनेंतर्गत’  शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावातील पात्र  शेतकऱ्यांची यात नावं आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला दुसरी यादी जाहीर होणार असून, तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****

No comments:

Post a Comment