Thursday, 13 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE –13.02.2020 TIME 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१३ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** रिजर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे आर्थिक गैरप्रकारांना आळा - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
** राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा
** दहावी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक
** विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना जाहीर
आणि
** बीड इथं आज पहिलं वृक्ष संमेलन
****
भारतीय रिजर्व्ह बँक करत असलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक गैरप्रकारांना आळा बसेल, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुणे इथं झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. ठेवींवरच विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवल्यानं गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं. या आणि अशा उपाययोजनांमुळे देशातल्या बँकिंग व्यवस्थेत स्थिरता येईल असं राष्ट्रपती म्हणाले. जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षीत कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी, असं ही राष्ट्रपतींनी नमूद केलं
****
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२०` ला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत, हा या विधेयकाचा उद्देश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात संसदेसमोर मांडलं जाईल. या विधेयकामुळे देशात सेंद्रीय कीटकनाशकांचा वापर वाढेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.
****
`आयुष्मान भारत` योजनेत समाविष्ट नसलेल्या प्राणघातक आणि खर्चिक आजारांच्या उपचारांसाठी, या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य निधीतून पंधरा लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली आहे.
****
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेतलेला हा निर्णय येत्या एकोणतीस तारखेपासून लागू होणार आहे. मात्र या निर्णयामुळे राज्य सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ररोज पंचेचाळीस मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. आता सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी असेल. ज्या शासकीय कार्यालयांच्या सेवा अत्यावश्यक आहेत, तसंच ज्या कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे, अशा कार्यालयांना मात्र पाच दिवसांचा आठवडा लागू असणार नाही.
****
ाज्यातल्या बालसंस्थांमधल्या मुलांचं कल्याण आणि पुनर्वसन करण्यासाठी राज्य बाल निधी निर्माण करायला आणि त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करायला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्य शासनाचा, इतर मागास वर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग, विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागासवर्गियांसाठीचा विभाग आता ”बहुजन कल्याण विभाग” या नावानं ओळखला जाईल.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेचं हीरक महोत्सवी वर्ष थाटात साजरं करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येऊन येत्या एक मेपासून राज्यभरात कार्यक्रम सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये संत परंपरा, शिवचरित्र, शास्त्रीय संगीत, आदिवासी लोककला, आदींचा समावेश आहे.
****
राज्यभरातल्या महाविद्यालयांमध्ये कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनानं करावी, असे निर्देश राज्यशासनानं दिले आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या शिवजयंतीपासून म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.
****
राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीची स्थापनाही करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची, तर सहअध्यक्ष पदी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांची निवड करण्यात आली आहे.
****
राठवाडा वॉटर ग्रीड संदर्भातही काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मराठवाड्यातल्या अकरा धरणांपैकी निम्म्या धरणांत पुरेसं पाणी नसतांना, ॉटरग्रीड उपयोगात कसं आणता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
****
घरगुती वापराच्या विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १४६ रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २२६ रुपयांनी वाढ झाली आहे. कालपासून हे दर लागू झाले. 
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये दहावी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्यपणे शिकवला जावा, यासाठीचं विधेयक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सध्या महाराष्ट्रात २५ हजार शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवला जात नसल्याचं आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विधयेकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल असं ते म्हणाले.
****
राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना जाहीर झाला असून श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन या संस्थेची निवड केली आहे. भाषा संवर्धक पुरस्कारासाठी आर.विवेकानंद गोपाळ तसंच अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.  
****
बीड इथं आज पहिलं वृक्ष संमेलन होत आहे. काल या निमित्तानं बीड इथं वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद एक वडाचं झाड भुषवत आहे. सह्याद्री देवराई परिसरात होत असलेल्या या संमेलनात निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर राज्यभरातले अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र येऊन भाजपविरुद्ध लढावं लागतय हाच भाजपचा विजय असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मंदी एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही, तर ती जागतिक पातळीवर असते, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात दोनशे ब्याण्णव ठिकाणी `पोस्ट पेमेंट बँकेची` पंचाऐंशी हजार खाती उघडण्यात आली आहेत. औरंगाबाद इथले वरिष्ठ व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या सर्व ठिकाणी येत्या अठरा तारखेला `पोस्ट पेमेंट बँक खाते` उघडण्यासंदर्भात महामेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाडा विभागात पाण्याचे स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेनं केली आहे. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं काल या परिषदेचं ३६वं अधिवेशन झालं. या अधिवेशनात मराठवाड्यातील दुष्काळ : सद्यस्थिती आणि उपाय, मराठवाडा विभागातील शैक्षणिक अनुशेष, कार्ल मार्क्स यांचे अर्थिक विचार, या विषयावर परिसंवाद झाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांन वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम केल्यानंतर दिलं जाणारं बारा हजार रुपयांचं प्रोत्साहन अनुदान तत्काळ मिळावं यासाठी ते थेट ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेनं केलं आहे.
****
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम राबवणार असल्याची घोषणा लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ते काल औसा पंचायत समितीत झालेल्या आमसभेत बोलत होते. आपल्या मतदारसंघात संपर्क-संवाद-समाधान अभियान राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत, पाण्याचं नियोजन करावं तसंच आवश्यकता भासेल तिथे लगेचच टँकर सुरू करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे दोन लाख ९१ हजार ४७७ लाभार्थी आहेत, यापैकी काही लाभार्थींनी आपलं बँक खातं आधार संलंग्नित केलेलं नाही, या शेतकऱ्यांनी बँक खातं आधार संलंग्नित करून घ्यावं, तसंच किसान क्रेडीट कार्ड सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
रम्यान, परभणी महापालिकेच्या नवीन नळ जोडणी शुल्काबाबत आयुक्त रमेश पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. नवीन नळ जोडणीसाठी प्रत्येकी ११ हजार रुपये आकारण्यात येत असल्यामुळे नागरिकांतू संताप व्यक्त होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या २९ गावांचा पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव योजनेत समावेश करण्यात आला आहे. पाणी फाउंडेशन चे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी या गावांना भेटी दिल्या असून ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हळदीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य हळदीपेक्षा तीन महिने लवकर काढणीला येणाऱ्या हळदीची लागवड गेल्या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती.
****


No comments:

Post a Comment