Friday, 14 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.02.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००

****

एल्गार परिषद प्रकरणी सुनावणी करत असलेल्या पुणे न्यायालयानं हे प्रकरण आज राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएच्या मुंबई न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले आहेत. हे प्रकरण सुनावणीसाठी वर्ग करावं या एनआयएच्या याचिकेला आपली कोणतीही हरकत नसल्याचं तत्पूर्वी, फिर्यादी पक्षानं एका अर्जाद्वारे स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे सोपवला तेंव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारनं यावर टीका केली होती.  

****

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह होती, याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्यानं केंद्रानं राज्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेतला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज कोल्हापूरमध्ये वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. गृहखात्याच्या अधिकाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारीवरून सकाळी याबाबत राज्य सरकारनं बैठक घेतली आणि सायंकाळी केंद्रानं तपास काढून घेत राज्याचा अधिकार केंद्रानं हिरावला, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली.

****

सरकारनं अर्थसंकल्पाद्वारे खाजगीकरणाचं धोरण अवलंबलं असल्याचा आरोप भाकपच्या नेत्या, खासदार वृंदा करात यांनी केला आहे. त्या आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भाकपतर्फे येत्या अठरा तारखेपर्यंत अर्थसंकल्पाविरुद्ध देशभर निदर्शनं केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआरची देशाला गरज नसल्याचं मत त्यांनी नोंदवलं. महाराष्ट्र आघाडी सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी- एनआरसी संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात हा कायदा लागू होऊ नये, म्हणून सरकारनं पुढाकार घ्यावा, असं त्या म्हणाल्या. घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेधही वृंदा करात यांनी यावेळी केला.

****

जम्मू - काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात गेल्या वर्षी शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश होता. या दोन्ही शहीद वीर जवानांना जिल्ह्यामध्ये आदरांजली वाहण्यात आली.

****

हिंगोली इथं पुलवामा हल्लयातल्या शहिदांना दलितमित्र, ज्येष्ठ नागरिक, युवक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलीतमित्र संघ, शेतकरी संघ, व्यापारी संघ आणि सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांनी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

****

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा तडाखा बसलेल्यांचं पुनर्वसन व्हावं आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरता वाळूजच्या बजाज ऑटो लिमिटेड कामगार संघटना आणि भारतीय कामगार सेनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख चोपन्न हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याचा धनादेश आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला. 

****

जालना इथल्या मंठा चौफुली परिसरात मुख्य रस्त्यालगतची चाळीस अतिक्रमणं नगरपालिकेनं आज हटवली. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

गर्भलिंग निदान प्रतिबंधक `पीसीएनडिटी` कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रवचनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर यांना अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. प्रवचनात गर्भधारणा आणि मुलगा किंवा मुलगी या संदर्भात वक्तव्य करून या कायद्याचा भंग केला असल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये गॅस दरवाढीच्या निषेधात सिलेंडरची पूजा करून हातगाड्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत महिलांसाठी मोफत गॅसजोडणी दिली परंतु सिलेंडरचे भाव वाढवले, अशी तक्रार यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

****

हिंगोली नगरपालिकेनं आज शहरातल्या प्रल्हाद बासटवार यांच्या गोदामावर छापा मारून दोन लाख रुपये किमतीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्या वापरावर आळा बसेल असा विश्वास नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

****

लेंडी नदीवर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालक्यातील गोणेगाव इथं प्रकल्पाचं शिल्लक बांधकाम येत्या वीस तारखेनंतर सुरू होईल, असं अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment