Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
शेतकऱ्यांना
कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार उपाय योजत असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कार वितरण
समारंभात ते आज बोलत होते. शेतकरी हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू असून सरकार सदैव त्याच्या
पाठीशी आहे, असं ठाकरे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी
महाविकास आघाडीचं सरकार उपाय योजत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. टंचाईग्रस्त
मराठवाडा, खानदेशसह राज्याच्या प्रत्येक भागात पाणी पोहचवण्याचं काम केंद्र आणि राज्य
सरकानं करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले.
जालना जिल्ह्यातील नांदापूर इथले शेतकरी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांना यावेळी आप्पासाहेब
पवार आधुनिक कृषि पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
पतसंस्था
चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं
सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार
आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. राज्य शासनाचा सहकार विभाग आणि राज्य
सहकारी पतसंस्था संघटनेनं आज अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा घेतला,
या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.
****
रिपब्लिक
ऑफ पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांचं आज पहाटे मुंबईत आगमन
झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं राजशिष्टाचार मंत्री
आदित्य ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केलं.
****
नाशिक शहरात
आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचं उद्घाटन सर्वोच्च
न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होत आहे. या परिषदेत उद्या मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन
करण्यात येणार आहे.
****
महिलाच आज
विचार आणि देश पुढं घेऊन जात असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम
महाजन यांनी केलं आहे. त्या आज औरंगाबाद इथं डॉक्टर इंदिराबाईं पाठक महाविद्यालयाच्या
सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. शिक्षक आणि पालक यांनी
मिळून पाल्याचं भवितव्य ठरवलं पाहिजे, असंही महाजन यावेळी म्हणाल्या.
****
संत गजानन
महाराजांचा एकशे बेचाळीसावा प्रगट दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या
संतनगरी शेगाव इथं गजानन महराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून जवळपास ८०० दिंड्या दाखल
झाल्या आहेत. औरंगाबाद इथंही गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी
गर्दी केली आहे.
****
दरम्यान,
बुलडाणा जिल्ह्यात प्रगट दिन महोत्सवासाठी पायी निघालेल्या वारीतील दोन युवक एका वाहनानं
दिलेल्या धडकेमध्ये मृत्यूमुखी पडले.
****
संत सेवालाल
महाराज यांच्या दोनशे एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात वनं, भूकंप आणि पुनर्वसन
मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद
इथं संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त दुचाकी वाहन फेरी काढण्यात आली.
****
जालना शहरातल्या
कुंडलिका आणि सीना नदी पात्रांच्या स्वच्छता अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. आमदार
कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे आदींची यावेळी उपस्थिती होती. लोकसहभागातून राबवण्यात येत असलेल्या
या अभियानांद्वारे प्लास्टिक कचरा संकलनासह दोन्ही नदीपात्र स्वच्छ करण्यात येणार आहे
****
गोंदिया जिल्ह्याच्या
गोरेगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार शेखर पुनसे याना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकानं आज पन्नास हजार रुपयांची लाच घेताना राहत्या घरी अटक केली आहे. या तहसीलदारानं
गौण खनिज विनापरवानगी काढल्याच्या आरोपावरून फिर्यादीला बारा लाख रुपये दंडाची नोटीस
बजावली होती. दंडाऐवजी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.
****
चंद्रपूर
जिल्ह्यातल्या सावली वन परिक्षेत्रातल्या मूल तालुक्यातील मोरवाई-बेलघाटा मार्गाला
लागून असलेल्या शेतात काम करीत असताना वाघानं केलेल्या हल्ल्यात एक महिला मृत्यूमुखी
पडली. आज दूपारी ही दूर्घटना घडली. मृत महिलेच्या कुटुंबियांना वन विभागातर्फे पंचवीस
हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment