आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
महिला अत्याचाराच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणं
आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं
पत्रकार परिषदेत बोलत होते. ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध
कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्याटप्यानं
केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून
यासाठी लवकरच पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आशियाई विकास बँकेच्या समन्वयानं
रस्ते विकासकामांसाठी ही तरतूद करण्यात येईल, असंही त्यांनी विधानसभेत एका पुरवणी प्रश्र्नाच्या
उत्तरात सांगितलं. यासंदर्भात केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी
यांची भेट घेणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात टमाट्याचं विक्रमी उत्पादन झालं
आहे. मात्र बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर टमाटे रस्त्यावर फेकण्याची
वेळ आली आहे. शासनानं टमाटा शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच
रुपये किलो प्रमाणे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
****
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात
भारतीय संघ पहिल्या डावात २४२ धावांवर बाद झाला आहे. ख्राईस्टचर्च इथं हँगले ओव्हल
मैदानावर सुरू या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारलं.
हनुमा विहारीनं पंचावन्न तर पृथ्वी शॉ आणि चेतेश्र्वर पुजारा यांनी प्रत्येकी चोपन्न
धावा केल्या तर काईल जेमीसननं पाच गडी बाद केले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत
न्यूझीलंड एक-शून्यनं आघाडीवर आहे.
****
आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत
मेलबर्न इथं भारतीय संघाचा अंतिम साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. श्रीलंकेनं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
****
No comments:
Post a Comment