Monday, 16 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

       कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश राज्यशासनानं दिले असून, सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज मुंबईत कोरोना प्रतिबंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. आतापर्यंत फक्त शहरी भागातली शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती, आता ग्रामीण भागातल्या शाळा महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा मात्र नियमित सुरु राहणार आहेत. नजिकच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकाही किमान तीन महिने पुढे ढकलण्याची सूचना निवडणूक आयोगाला करण्यात आल्याचं, टोपे यांनी सांगितलं.

       राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात आहे. तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं टोपे यांनी नमूद केलं. थेट कोरोनाची लागण होऊन आलेले रुग्ण पहिल्या टप्प्यात, तर त्यांच्यामुळे बाधित झालेले रुग्ण दुसऱ्या टप्प्यात मानले जातात. हा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी होणाऱ्या ठिकाणी कलम १४४ अर्थात जमावबंदी जारी लावण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर जनहितार्थ आवश्यक सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले असून, मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी या अधिकारांचा वापर करावा, शक्य असेल त्या सर्व आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरी राहून कार्यालयीन काम करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्राध्यापक, शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांनी येत्या २५ तारखेपर्यंत घरूनच काम करावं, येत्या २६ किंवा २७ तारखेला परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

       राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ झाली असून, यापैकी पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक नऊ, पुण्यात सात, मुंबई सहा, नागपूर चार, यवतमाळ आणि कल्याण प्रत्येकी तीन, नवी मुंबई दोन, तर रायगड-ठाणे-अहमदनगर आणि औरंगाबाद मधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. घरी विलगीकरणात राहण्याची सूचना केलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांच्या हातावर शिक्का मारला जाणार आहे. रुग्णांनी उपचार करून घेण्यास सहकार्य करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं. विलगीकरण कक्षात रुग्णांसाठी किमान सुविधांसह मनोरंजनाची साधनं उपलब्ध असावीत, असंही टोपे यांनी सूचित केलं आहे.
****

 दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा राज्यस्तररीय आढावा घेतला. कोरोनाबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत खबरदारी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खासगी प्रवासी कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा. सार्वजनिक ठिकाणांवर खबरदारीच्या उपाययोजनांची प्रसिद्धी करण्यात यावी. प्रसार माध्यमे, लोक प्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सुचना ठाकरे यांनी यावेळी केल्या.

 कोरोनाबाबतच्या उपाययोजनांसाठी तातडीचा निधी म्हणून कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना अनुक्रमे १५ आणि १० कोटी रुपये  तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक पाच कोटी रुपये, असा एकूण ४५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य आपत्ती निवारण निधीत देण्यात येणार असल्याचं, सांगण्यात आलं.
     
  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
****

 दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर राज्यातली अनेक मोठी मंदिरं, पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचे दर्शन उद्यापासून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली. धार्मिक कार्यक्रम तसेच इतर पूजा विधी नियमित पार पडणार असून फक्त भाविकांसाठी दर्शन बंद केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीची चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या २ एप्रिलपासून हा चैत्रोत्सव सुरू होणार होता.

 पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातली पंगत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

       औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा तसंच वेरुळच्या लेण्या, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्लाही पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून जिल्ह्यात खबरदारी म्हणून सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज केल्या आहेत. याबाबत कोणीही अफवा पसरवू नये असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment